इंटरनेट हा सध्या जणू काही ज्याच्या त्याच्या जीवनाचा भाग झाला आहे. इंटरनेट पाहण्यात अनेकजण दिवसाचे तासन् तास घालवितात. बहुतेकांच्या हाती स्मार्टफोन्स आल्यापासून तर ‘अहो येता जाता, उठत बसता, कार्य करता’ या उक्तीप्रमाणे इंटनेट पाहिले जाते. अशा स्थितीत इंटरनेट नाही अशी जगात कोणतेही स्थान नसेल, असे आपल्याला वाटणे अगदी स्वाभाविक आहे.
तथापि, या जगात असाही एक देश आहे, की जेथे इंटरनेट नाही. येथील कोणताही नागरीक कधीही इंटरनेट पहात नाही किंवा त्याचा उपयोगही करत नाही. या देशाचे नाव ‘इरिट्रिया’ असे असून आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात आहे. या देशाच्या आजूबाजूचे सर्व देश इंटरनेटने व्याप्त आहेत. पण या देशात ही सुविधा नाही. जगात जे थोडे देश ‘लपलेले’ म्हणून ओळखले जातात, त्यांच्यात या देशाची गणना होते. हा देश पूर्णत: इंटरनेटमुक्त आहे, असे दिसून येते.
हा देश तसा लहान, अर्थात 1 लाख 17 हजार चौरस किलोमीटरचा आहे. त्याची लोकसंख्या 35 लाख इतकी आहे. हा हुकुमशाही पद्धतीने चालणारा देश असल्याने त्याला आफ्रिकेचा ‘उत्तर कोरिया’ असेही संबोधले जाते. या देशात ग्रिन्या, इंग्रजी सह अनेक स्थानिक भाषा बोलल्या जातात. या देशाचे आणखी एक आगळे वेगळे वैशिष्ठ्या असे की या देशाला स्वत:ची एक राष्ट्रीय भाषा नाही. जगापासून अलिप्त असा हा देश आहे. अस्मारा ही या देशाची राजधानी असून ती ‘छोटे रोम’ म्हणून प्रसिद्ध आहे. या देशाचे आणि इंटरनेटचे काय वाकडे आहे, असा प्रश्न विचारला जाणे साहजिक आहे. इंटरनेट नसणारा हा जगातील एकमेव देश आहे. कारण, येथे दूरसंचार सेवा प्रचंड महाग आहे. काही कार्यालयांमध्ये अलिकडच्या काळात इंटरनेट सुविधा देण्याचा प्रयत्न झाला आहे. पण स्पीड 2 जी पेक्षा अधिक नाही. शिवाय तासाला चार्ज 100 रुपयांहून अधिक असतो. त्यामुळे या देशात इंटरनेटचे कोणालाही आकर्षण नसल्याचे दिसून येत आहे.









