लोकसभेत नागरी उड्डाण मंत्र्यांचे आश्वासन
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नाच्या माध्यमातून विमान प्रवासदरात अचानक वाढ होण्याचा मुद्दा उपस्थित करत द्रमुक खासदार दयानिधी मारन यांनी चौकशीची मागणी केली. चेन्नई-दिल्ली मार्गासाठी तिकीट आरक्षित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रारंभी 25 हजार रुपयांची किंमत दर्शविली जाते, परंतु बुकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रवासभाडे दोन ते तीनपट अधिक होत असल्याचा आरोप मारन यांनी केला. यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. टाटा समुहाची सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसकडून लागू करण्यात आलेले एखादे तंत्रज्ञान हवाईप्रवासाचे भाडे कसे वाढवू शकते असा प्रश्न मारन यांनी उपस्थित केला. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही काही अन्य खासदारांकडून अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत तिकिटांचा खर्च संसदेकडून उचलला जात असल्याने याप्रकरणी सखोली चौकशी व्हावी अशी सूचना केली.
यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू किंजरापू यांनी याप्रकरणी चौकशी करविणार असल्याचे सांगितले. खासदारांना बिझनेस क्लासमधून प्रवास करण्याचा अधिकार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यापासून सर्वसामान्य लोकासाठी हवाई प्रवास स्वस्त व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. हवाई प्रवासभाडे बाजार संचालित असते आणि कुठल्याही क्षेत्राचे प्रवासभाडे निश्चित करताना अनेक घटक भूमिका बजावत असल्याचे नायडू यांनी म्हटले आहे. ग्राहक राजा असून तोच मंत्रालयाची प्राथमिकता आहे. हवाई प्रवास स्वस्त करण्यासाठी शक्य ती सर्व पावले आम्ही उचलत आहोत. आंतरराष्ट्रीय मार्गांवर सुटीच्या काळात अधिक प्रवासभाडे आकारण्यात येत असल्याच्या आरोपांची आम्ही चौकशी करणार आहोत. हवाईप्रवासाचे भाडे सरकार नियंत्रित करू शकत नाही. कुठल्याही मार्गावर प्रवासभाडे ऋतू, सुटी आणि सणासुदीचा काळ, इंधनखर्च, प्रतिस्पर्धा आणि अशाच प्रकारच्या अन्य घटकांवर निर्भरत असते असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. एअरलाइन मूल्यनिर्धारण अनेक स्तरांमध्ये (बकेट किंवा आरबीडी) होते, जे जागतिक स्तरावर अवलंबिल्या जाणाऱ्या व्यवस्थेच्या अनुरुप आहे. पूर्वी खरेदी करण्यात आलेले तिकीट प्रवासाच्या तारखेच्या नजीक खरेदी करण्यात आलेल्या तिकिटांच्या तुलनेत अत्यंत स्वस्त असतात असेही नायडू यांनी नमूद केले आहे.









