एकंबे :
ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत ग्रामस्थांच्या तक्रारीची पडताळणी केली जाईल. या संदर्भात चौकशी करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. राज्य शासनाचे नुकसान करणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
ल्हासुर्णे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने रविवारी सकाळी साडेनऊ वाजता बोराटवाडी (ता. माण) येथील निवासस्थानी मंत्री गोरे यांची भेट घेतली. यावेळी निवेदन सादर करुन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. संपत सावंत, मोहन सावंत, संजय जाधव, सुनील सावंत, राजेंद्र सावंत, सुरेश घाडगे, अजय जाधव, श्रीतेज जाधव आणि शिवाजी गुरव, सागर मच्छिंदर यांच्या शिष्टमंडळाने मंत्री गोरे यांना सविस्तर माहिती दिली. राज्य शासनाचे ठेकेदाराने कशा पद्धतीने नुकसान केले हे दाखवून दिले. ग्रामस्थांना नाईलाजास्तव दूषित पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे साथीचे रोग पसरत असल्याचे या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
मंत्री गोरे यांना सादर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले, जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केले आहे. ठेकेदाराने शासनाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले. या योजनेतून येणारे पाणी दूषित असून त्या पाण्याचा रंग पिवळसर असतो. त्याचा उग्र वास येत असून त्यामध्ये आळ्या सापडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
गावातील जुनी पाणीपुरवठा योजना सुरळीत होती, त्यातून चांगले पिण्यालायक पाणी मिळत होते, मात्र त्या योजनेच्या जलवाहिन्यांना नवीन जलजीवन मिशनच्या योजनेची जलवाहिनी जोडली असल्याने आता दूषित पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. जुनी पाणीपुरवठा योजना आणि नवीन पाणीपुरवठा योजना वेगवेगळी ठेवावी. ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा. आपण या विषयामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून ग्रामस्थांना न्याय द्यावा. या निवेदनावर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








