पुणे : कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटप केल्याच्या आरोपावरुन भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
गणेश बिडकर यांच्यासह मयूर चव्हाण, नईम शेख, बाला शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. याबाबत युवक काँग्रेस कॅन्टोन्मेंट विभागाचे माजी अध्यक्ष फैयाज कासम शेख (वय 38, रा. 216 मंगळवार पेठ, मालधक्का चौक) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बिडकर आणि त्यांचे कार्यकर्ते रविवारी (26 फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील आएशा कॉम्प्लेक्समध्ये कार्यकर्त्यांसह आले होते. फैयाज शेख आणि त्यांचे मित्र याकूब बशीर शेख या भागात फिरत होते. त्या वेळी भाजपचे कार्यकर्ते आएशा कॉम्प्लेक्समध्ये पैसे वाटप करत असल्याची माहिती शेख यांना मिळाली. त्यानंतर शेख तेथे गेले. तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हातात केशरी रंगाची पिशवी दिसून आली. पिशवीत मतदार स्लिप ठेवण्यात आल्या होत्या. पिशवीत पैसे असल्याचे शेख यांना समजले. त्यांनी बिडकर आणि कार्यकर्त्यांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी फैयाज आणि याकूब शेख यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली, असे फैयाज शेख यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.
अधिक वाचा : ‘अग्निपथ’ योजनेविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या