परिवहन महामंडळाच्या महसुलात वाढ : शालेय सुट्टय़ांमुळे पर्यटन स्थळांना भेट देण्याला प्रवाशांचे प्राधान्य
प्रतिनिधी /बेळगाव
लग्नसराई, यात्रा-जत्रा आणि शालेय सुट्टय़ांमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात परिवहनला दिलासा मिळाला आहे. मागील दोन वर्षात परिवहनचे आर्थिकदृष्टय़ा प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आता विविध माध्यमातून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने कार्यक्रम वाढले आहेत. त्यामुळे प्रवासी संख्याही वाढली आहे.
शालेय सुट्टय़ांमुळे ये-जा करणाऱयांची संख्या वाढली आहे. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रात्रीचा प्रवास करणाऱया वातानुकूलित बसेसनाही प्रतिसाद वाढत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे, मुंबई, हैद्राबाद, नाशिक, बेंगळूर, म्हैसूर, बळ्ळारी, बागलकोट आदी ठिकाणी बस धावत आहेत. याबरोबर इतर ठिकाणी बस सुरळीत सुरू झाल्या आहेत. शाळांना सुट्टी असल्यामुळे पर्यटनस्थळांना भेट देणाऱया प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे परिवहनच्या महसुलात वाढ होत आहे.
अनेक भागात यात्रा-जत्रा वाढल्याने प्रवाशांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे स्थानिक बसेसनाही प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्याबरोबर लग्नसराईमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुळे बेळगाव विभागाला 110 कोटींचा फटका बसला होता. दरम्यान परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाल्याने कर्मचाऱयांचे वेतन देणेही कठीण झाले होते. अशा परिस्थितीत परिवहनच्या मदतीला राज्य सरकार धावून आले होते. मागील चार महिन्यांपासून बससेवा हळूहळू सुरळीत होत आहे. त्यामुळे उत्पन्नही हळूहळू वाढत आहे.
बेळगाव विभागाचे उत्पन्न इतर विभागापेक्षा अधिक
बेळगाव विभागाचे उत्पन्न हे इतर विभागापेक्षा अधिक आहे. बेळगाव विभागातून महाराष्ट्र आणि गोव्यात धावणाऱया बसेसची संख्या अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्यात धावणाऱया माध्यमातून बेळगाव विभागाला एकूण उत्पन्नापैकी 40 टक्के उत्पन्न प्राप्त होते. सीमाहद्दीवरील आरटीपीसीआरची सक्ती मागे घेण्यात आल्यानंतर कर्नाटकची बस महाराष्ट्र आणि गोवा हद्दीत सुसाट धावत आहे. त्यामुळे उत्पन्न वाढले आहे.
लांब पल्ल्यांच्या प्रवासी संख्येत वाढ
यात्रा-जत्रा व लग्नसराईमुळे स्थानिक प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर सुट्टय़ांमुळे लांब पल्ल्यांच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बसही अधिक प्रमाणात धावत आहेत. त्यामुळे महसूलही वाढत आहे.
– के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)









