बनवडी कॉर्नर येथे किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत
कराड : कराड तालुक्यातील बनवडी कॉर्नर येथे किरकोळ वादातून एका ६३ वर्षीय निवृत्त व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्रकाश कुंभार (रा. जनार्दन रो हाऊस, बनवडी कॉर्नर) याच्याविरूद्ध कराड शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बळवंत महादेव मोहिते (वय ६३, रा. सिल्व्डर गार्डन, बनवडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचे जनार्दन रो हाऊस बनवडी कॉर्नर येथे स्लॅब टाकण्याचे बांधकाम सुरू आहे. तेथे ते दररोज पाणी मारण्यासाठी जातात. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे कामाच्या ठिकाणी गेले असता पाणी मारताना थोडे पाणी शेजारील प्रकाश कुंभार यांच्या जागेत उडाल्याने त्यांच्यात किरकोळ वाद झाला.
यावेळी प्रकाश कुंभार यांनी शिवीगाळ केली. त्यावर मोहिते यांनी थोडं पाणी पडणारच असे सांगितल्यावर कुंभार संतापले आणि ते थेट स्लॅबवर येऊन ‘तुला दाखवतोच’ आता असे म्हणत हातातील लोखंडी रॉडने हल्ला केला. मोहिते यांनी हात आडवा केल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ रॉ ड लागला आणि ते खाली पडले. याप्रकरणी कराड शहर पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.








