हिंसेशी संबंधित छायाचित्रे अन् व्हिडिओ शेअर करण्यावर बंदी
वृत्तसंस्था /इंफाळ
मागील 5 महिन्यांपासून हिंसेला तोंड देणाऱ्या मणिपूरमध्ये सरकारने आता नव्याने हिंसा भडकू नये म्हणून पावले उचलली आहेत. राज्यात कुठल्याही हिंसेचा व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. अशाप्रकारच्या कुठल्याही कंटेंट शेअरिंगवर बंदी घालण्यात आली आहे. याचबरोबर मोबाइल इंटरनेट सेवेवरील बंदी आणखी 5 दिवस कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी कुकी-जोमी व्यक्तीला जिवंत जाळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतरच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. हिंसेची छायाचित्रे अन् व्हिडिओ पसरविणाऱ्या लोकांवर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
राज्य सरकार हिंसक घडामोडींची छायाचित्रे अन् व्हिडिओंना अत्यंत गांभीर्याने अन् संवेदनशीलतेसह सामोरे जात आहे. अशा गोष्टी शेअर केल्याने पुन्हा जमाव जमून शासकीय संपत्तीला हानी पोहोचविली जाऊ शकते किंवा जीवितहानी होऊ शकते. यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते असे राज्याच्या गृह विभागाने म्हटले आहे. राज्यात स्थिती सामान्य करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून अशाप्रकारचे व्हिडिओ आणि छायाचित्रे शेअर करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारची छायाचित्रे किंवा व्हिडिओ कुणाकडे असल्यास त्याने नजीकच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधावा. परंतु लोकांनी जर सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाप्रकारचा कंटेंट शेअर केल्यास संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे सरकारकडून नमूद करण्यात आले आहे.









