वैश्विक दक्षिण संम्मेलनाच्या सांगता प्रसंगी भाषण, सहकार्य दृढ करण्यावर दिला भर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दक्षिण गोलार्धातील देशांच्या व्हर्चुअल संम्मेलनाच्या सांगता प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाचा प्रस्ताव सादर केला आहे. ग्लोबल डेव्हलपमेंट काँपॅक्ट असे या प्रस्तावाचे शीर्षक आहे. या प्रस्तावाचा उद्देश दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये व्यापार, स्थिर आणि दीर्घकालीन विकास आणि तंत्रज्ञान विकास साध्य करणे हा आहे. तसेच दक्षिण गोलार्धातील देशांना त्यांच्या प्रकल्पांसाठी वाजवी व्याजदरात कर्जे मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या संम्मेलनाच्या सांगता प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी दक्षिण गोलार्धातील देशांच्या क्षमतांचा उल्लेख केला. जगाच्या या भागाला योग्य संधी मिळाल्यास त्याची झपाट्याने प्रगती होऊ शकते. जगाच्या या भागात गरीब देशांची संख्या अधिक आहे. मात्र, या देशांकडे साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. या साधन संपत्तीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली, तर या भागाची मोठी प्रगती होऊ शकते. या भागातील देशांनी उत्तर गोलार्धातील प्रगत देशांशी सहयोग करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.
भारताकडून आर्थिक कोष
दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी भारताने 25 लाख डॉलर्सचा एक निधीकोष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा प्रारंभीचा निधी आहे. नंतर इतर देशही त्यात योगदान करण्याची शक्यता आहे. दक्षिण गोलार्धातील गरीब देशांना कर्जाचा असह्या भार सहन करावा लागू नये, म्हणून हा कोष स्थापन केलेला आहे.
दक्षिण-उत्तर सहकार्य आवश्यक
दक्षिण गोलार्धातील देशांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांचे उत्तर गोलार्धातील देशांशी सहकार्य असणे अत्यावश्यक आहे. यासाठी या दोन भागांमधील सर्व प्रकारचे अंतर कमी करण्याची आवश्यकता आहे. या उद्देशाने पुढच्या महिन्यात या दोन्ही गोलार्धांमधील देशांचे ‘भविष्य शिखर सम्मेलन’ आयोजित करण्यात आले आहे हे संम्मेलन या दिशेने एक मैलाचा दगड ठरेल, अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या आपल्या भाषणात केली आहे.









