कराडजवळची घटना; दरोडेखोरांनी रोकड चोरीसाठी एटीएमला लावले जिलेटीन
वार्ताहर/ कराड
कराड-विटा रोडवर कराडजवळच्या गोवारे येथे बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन जिलेटीन लाऊन स्फोट घडवण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांशी पोलिसांची थरारक झटापट झाल्याचा प्रकार सोमवारी पहाटे पावणेतीन वाजता घडला. यात तीन पोलिसांसह एक होमगार्ड यांची दरोडेखोरांवरील पकड मजबूत होत असतानाच एका दरोडेखोराने खिशातून व्हेपर स्प्रेची बाटली काढत पोलिसांच्या डोळ्यात मारली. स्प्रे डोळ्यात गेल्याने पकड ढिली झाल्याचा फायदा घेत तीन दरोडेखोर अंधारातून पसार झाले. मात्र तरीही दोन पोलिसांनी एका दरोडेखोराला पकडून ठेवले. सचिन अशोकराव वाघमोडे (वय 38, रा. आदर्शनगर, काळेवाडी, जि. पुणे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, दहा तासांनी पोलिसांनी परिसर निर्मनुष्य करून या जिलेटीनचा स्फोट घडवत ते निकामी केले. यात एटीएम उद्ध्वस्त झाले. या खळबळजनक घटनेची चर्चा जिल्हय़ात सुरू होती.

स्फोटाच्या तयारीनेच दरोडेखोरांचा प्लॅन
पोलिसांच्या माहितीनुसार, कराड-विटा रोडवर गोवारे हद्दीत बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. चार दरोडेखोरांनी पाळत ठेऊन सोमवारी पहाटे एटीएम मशिन जिलेटीनच्या कांडय़ांचा वापर करून फोडण्यासाठी स्फोटाची तयारी केली होती. एक स्थानिक, अन्य तिघे पुण्यासह इतर भागातील असे चार दरोडेखोर सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास एटीएम सेंटरजवळ आले. त्यांनी एटीएम मशिनला जिलेटीनच्या कांडय़ा व डिटोनेटर, पेट्रोल बॉम्ब जोडून अंदाजे 30 मीटर अंतरावरून स्फोट घडवण्याची तयारी सुरू केली. जिलेटीनच्या कांडय़ा, डिटोनेटर एटीएम मशिनमध्ये घुसवून त्याची वायर काही अंतरापर्यंत नेऊन ती एका बॅटरीला जोडली होती. स्फोट करण्याची तयारी पूर्ण झाली असतानाच पोलिसांची घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांशी दोन हात केले.
बॅंकेची यंत्रणा अलर्ट…पोलिसांचे धाडस
बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटीनचा स्फोट करून फोडण्याचा सुरू असलेला प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. या सीसीटीव्ही कॅमेरांच्या हालचाली स्थानिक शाखेसह मुंबईतील बॅंकेच्या मुख्यालयाला कनेक्ट होत्या. मुंबईतून दरोडेखोरांच्या हालचालींची माहिती वेगाने पोलीस वायरलेस कक्षाला कळवण्यात आली. कराडच्या वायरलेस कक्षातील महिला पोलीस प्रसंगावधान दाखवत हा प्रकार त्या परिसरात गस्त घालत असलेल्या दामिनी पोलीस पथकाला कळवला. ही सर्व हालचाल अवघ्या काही मिनिटात झाल्याने पोलीस पथक वेळेत बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरजवळ पोहोचले.
जिवावर उधार होत दरोडेखोरांना पकडले पण…
दरोडेखोर अवघ्या काही क्षणात स्फोट घडवण्याच्या तयारीत असतानाच दामिनी पोलीस पथकाचे हवालदार जयसिंग राजगे, हवालदार सचिन सूर्यवंशी, संग्राम पाटील, गृहरक्षक दलाचे सुशांत निकम यांनी दरोडेखोरांवर झडप टाकली. काठीशिवाय कोणतेही शस्त्र नसताना जिवावर उधार होत पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळत त्यांचा कट उधळून लावला. यावेळी दरोडेखोरांची पोलिसांशी झटापट झाली. या झटापटीत पोलीस जखमीही झाले मात्र त्यांनी दरोडेखोरांवरची पकड घट्ट करत त्यांना जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. सुमारे पंधरा मिनिटे ही झटापट सुरू होती. याचवेळी एका दरोडेखोराने पोलीस जयसिंग राजगे, सचिन सूर्यवंशी, होमगार्ड निकम यांच्या डोळ्यात व्हेपर स्प्रे मारला. त्यामुळे पोलिसांची पकड काहीशी ढिली झाली. याचा अंदाज घेत तीन दरोडेखोर तेथून पसार झाले. मात्र पोलिसांनी एका दरोडेखोरावरची पकड कायम ठेवत त्याला बेडय़ा ठोकल्या.
कर्तव्यदक्ष तीन पोलीस जखमी
डोळ्यात स्प्रे मारल्याने दरोडेखोरांना पकडून ठेवलेले तीन पोलीस जखमी झाले. दरम्यान, हा प्रकार समजताच पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील वेगाने घटनास्थळी आले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पहिल्यांदा जखमी पोलिसांना कृष्णा रूग्णालयात उपचाराठी हलवले. त्यांनी पकडलेल्या एका दरोडेखोराला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. वायरलेसद्वारे जिल्हाभर नाकाबंदी करत वर्णनावरून पळालेल्या तीन दरोडेखोरांच्या तपासासाठी गुन्हे शाखेसह अतिरिक्त पोलीस यंत्रणा कामाला लावली.
स्फोटापूर्वी परिसर केला निर्मनुष्य
दरोडेखोरांनी एटीएम फोडण्यासाठी जिलेटीनच्या कांडय़ा पेरून ठेवत स्फोटाची तयारी पूर्ण केली होती. मात्र पोलीस पोहोचल्याने स्फोट करण्याचा कट उधळला गेला. मात्र दरोडेखोरांनी पेरलेल्या जिवंत जिलेटीनच्या कांडय़ा व पेट्रोल बॉम्ब निकामी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांनी बॉम्बनाशक पथकासह परिसराची पाहणी केली. बॉम्बनाशक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत घाडगे, संतोष शिंदे, हवालदार अतुल जाधव, किरण मेरे, रूपेश साळुंखे, निलेश दयाळ, विजय सावंत, श्वान रूद्रा आणि सुर्या यांनी या परिसराचा अंदाज घेतला. एटीएम इमारतीच्यावरील ब्रिलियंट ऍकॅडमी मोकळी केली. आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य करत कराड-विटा मार्गावरील वाहतूकही लांब अंतरावर रोखली. ब्लास्ट करण्यापूर्वी पोलिसांनी प्रत्येक कोपरा न कोपरा तपासून पाहात कोणी मनुष्य त्या परिसरात नाही ना? याची खात्री केली. त्यानंतर बॉम्बनाशक पथकाने अगदी काळजीपुर्वक जिलेटिनचा स्फोट करत ते निकामी केले. दरोडेखोरांना पकडणाऱया पोलीस कर्मचाऱयांना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तातडीचे दहा हजारांचे रिवॉर्ड जाहीर केले आहे.








