सातारा :
फडणवीसांच्या गतीमान प्रशासनाची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रचिती आली. प्रशासनावर मांड असल्यावर सरकारचा वेग काय असतो हे या निमित्ताने दिसून आलं.
दरम्यान, जन्मस्थळ असलेल्या मुंबईतील ‘मेघदूत’ बंगल्यात मंत्री म्हणून रहायला गेल्यानंतर मंत्री शंभूराज यांचा पहिलाच साताऱ्यात दौरा झाला. दुपारी जिल्हाधिकाऱ्यालयात पत्रकार परिषदेसाठी त्यांचं आगमन होताच त्यांनी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना खडसावले. जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसले असताना खणाणलेला फोन थेट पालकमंत्र्यांनीच उचलला आणि फोनकर्त्यां संबंधित वकिलाच्या कामाच्या थेट सूचना देत ‘गतीमान प्रशासनाची’ प्रचिती दिली. हि क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
त्याचं झालं कि, पालकमंत्र्यांच्या येण्यानं दुपारी काहीशी सुस्त असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक थोडीशी तारांबळ उडाली. पत्रकारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये बसण्याची विनंती केली. तोपर्यंत पालकमंत्री शंभूराज देसाई हे साईबाबा मंदिरातून दर्शन घेवून आले. त्यांची एन्ट्री जिल्हाधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये होताच पत्रकारांची गैरसुविधा झाल्याची बाब निदर्शनास त्यांच्या आल्याने त्यांनी लगेच निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना खडसावले. दरम्यान, त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिल्यानंतर पत्रकारांच्यासोबतच जावून त्यांनी जुन्या इमारतीच्या नुतनीकरणाची पाहणी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, नुकतेच पर्यटन विभागाच्यावतीने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने महाबळेश्वर येथे 15 कर्मचारी, पाचगणी येथे 10 कर्मचारी, मुंबई येथील टुरिस्ट पाईंटवर असलेल्या कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला आहे. तीन महिन्याचा चांगला परफॉर्म राहिला आहे. काही सूचना कायद्याच्या अनुषंगाने देण्यात येणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी होत्या. त्या जाणून घेतल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी आम्ही सूचना दिल्या आहेत. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी हा उपक्रम राबवण्यात आहे. सध्या पोलिसांच्या गाड्या भाडे तत्वावर वापरत आहोत. 4 गाड्या पर्यटन महामंडळासाठी खरेदी करू, पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी स्वतंत्र दल स्थापन करण्यात येत आहे, असे सांगत ते म्हणाले. पुढचा आमचा प्लॅन बॅक वॉटर फेस्टिव्हल घेण्याचा मानस आहे. डिसेंबर 15 ते 15 जानेवारी पर्यत हा महोत्सव होणार आहे. हा महोत्सव गतवेळपेक्षाही दर्जेदार कसा होईल याचाही प्रयत्न असणार आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे लेझर शोच्या प्रश्नावर लेझर शो महाबळेश्वरात कसे कायमस्वरुपी करता येईल याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अनुमती दिली की आमचा पाठपुरावा सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बैठकीला दिल्लीला गेल्याबाबत प्रश्न छेडला असता ते म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या हयातीत काँग्रेसला दारात सुद्धा उभी केली नाही. त्याच काँग्रेसच्या दारात उद्धव ठाकरे साहेब जात आहेत. आमचा शपथविधी झाला त्याच दिवसापासून आम्ही कामाला लागलो आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे हे दिल्लीत आहेत. त्यांचा डिनर महाविकास आघाडीसोबत होणार मग ते चर्चा करणार, त्यांची ती ठरलेली चर्चा असणार असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
- अन् जिल्हाधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये आलेला पालकमंत्र्यांनी फोन उचलला
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांची पत्रकार परिषद असल्याने सर्वच कर्मचारी, अधिकारी हे अलर्ट मोडवर होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये पालकमंत्र्यांची प्रेस सुरु असतानाच अचानक लॅण्डलाईन फोन वाजला. तो फोन पालकमंत्री यांनीच उचलला. समोरुन विचारले जिल्हाधिकारी आहेत काय, सातबाऱ्याचे काम तलाठी करत नाहीत, अशी काही तरी तक्रार समोरुन बोलणाऱ्या शहा नामक वकिलांची होती. शेवटी पालकमंत्र्यांनी मी पालकमंत्री बोलतोय, तुमचे काम होवून जाईल मी सूचना दिल्या आहेत. असे सांगून पालकमंत्र्यांनीच मी किती तत्पर आहे असे पत्रकारांना सांगताच पत्रकार म्हणाले, पत्रकारांचे तुम्ही फोन उचलत नाही. प्रतिक्रियेकरता आम्ही फोन करतो. तेव्हा पालकमंत्री म्हणाले, माझ्याकडे फोन नाही, पीएकडे माझा फोन असतो, असे सांगितले. दरम्यान, त्यांनी जुन्या इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामाची पाहणी पत्रकारांसोबत केली. त्या इमारतीचे लोर्कापण दि. 15 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. तसेच भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्याबाबत काही पत्रकारांनी विचारणा केली असता तिरंगा हाच श्रेष्ठ आहे, असे उत्तर दिले.








