बिहारमधील नालंदा मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त जनता दल आणि भाकप (माले) अशी स्पर्धा रंगली आहे. नालंदाचे ऐतिहासिक महत्व आहे. येथील विश्वविख्यात विश्वविद्यालय बख्तियार खिलजी नामक परकीय आक्रमकाने भस्मसात केले होते आणि पुरातन ज्ञानाचा फार मोठा ठेवा संपवून धर्मांधतेचा कळस गाठला होता. या विश्वविद्यालयाचे भग्नावशेष अद्यापही येथे दिसतात. 2024 मध्ये या मतदारसंघातील राजकीय युद्धात कोण कोणाला मात देणार यावर बरीच उलटसुलट मते व्यक्त तज्ञांकडून व्यक्त केली जात आहेत.
भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल यांच्या युतीत हा मतदारसंघ संयुक्त जनता दलाला मिळाला आहे. 2009, 2014 आणि 2019 या सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये येथून या पक्षाचे कौशलेंद्र कुमार विजयी झाले होते. त्यांनाच याही निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माले) या पक्षाने 36 वर्षांचे तरुण नेते संदीप सौरव यांना उतरविले आहे. ते शेतकरी कुटुंबातील असून जेएनयु मधून पीएचडी झालेले आहेत. अशा प्रकारे येथे ज्येष्ठ विरुद्ध तरुण अशी लढत होत आहे.
नितीश कुमार लोकप्रिय
या भागात नितीश कुमार लोकप्रिय आहेत. हा मतदारसंघही त्यांना मानणारा आहे. 1996 ते 2019 या कालावधीत येथून केवळ असेच उमेदवार जिंकले आहेत, की ज्यांच्यावर नितीश कुमार यांचा वरदहस्त आहे. याच पक्षाचे दिग्गज नेते जॉर्ज फर्नांडिस या मतदारसंघातून 1996, 1998 आणि 1999 अशा तीन लोकसभा निवडणुका जिंकले होते. यंदाही येथे कुमार यांची लोकप्रियता पणाला लागलेली आहे. त्यांचे कार्यही या भागात मोठे असल्याचे दिसून येते.
लोकसंख्येचे समीकरण
नितीश कुमार कुर्मी समाजातील आहेत. या समाजाची संख्या येथे 24 टक्के असून यादव 15 टक्के आहेत. मुस्लीम तुलनेने कमी म्हणजे 10 टक्के आहेत. येथे मतदारांची संख्या 22 लाखांहून अधिक असून त्यांच्यातील 40 टक्के अन्य मागासवर्गीय समाजांमधील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियताही या भागात मोठी असून त्यांच्यासाठी मतदान करणार, असे अनेक मतदार स्पष्टपणे प्रतिपादन करताना दिसून येतात. लालू यादव यांना मानणारा वर्गही येथे आहे.
मागच्या दोन निवडणुकांचे परिणाम
2014 मध्ये संयुक्त जनता दलाने हा मतदारसंघ 34.93 टक्के मते मिळवून निसटत्या बहुमताने जिंकला होता. त्यावेळी भारतीय जनता पक्ष आणि हा पक्ष यांची युती नव्हती. 2019 च्या निवडणुकीत अशी युती असताना कौशलेंद्र कुमार यांना 52.42 टक्के मते पडून त्यांचा प्रचंड मताधिक्क्याने विजय झाला होता.









