हिंदू पत्नीला मारुन केले 50 तुकडे, आरोपी अन्सारीला अटक
@ साहिबगंज / वृत्तसंस्था
दिल्लीत काही महिन्यांपूर्वी घडलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणापेक्षाही क्रूर प्रकरण झारखंडमधील साहिबगंज येथे घडले आहे. या प्रकरणातील आरोपी दिलदार अन्सारी याने आपली हिंदू पत्नी रिबिका पहाडिन हिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 50 तुकडे केले. ते तुकडे आजूबाजूच्या प्रदेशात त्याने फेकून दिले. भटकी कुत्री ते तुकडे खात असल्याचे पाहून काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हे निर्घृण हत्या प्रकरण उघडकीस आले आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृतदेहाच्या तुकडय़ांचा शोध सुरु असून आतापर्यंत 18 तुकडे हाती लागले आहेत. अनेक तुकडे पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरुन ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले आहेत. या प्रकरणात बळी गेलेली युवती रिबिका ही आदीम पहाहिया या आदिवासी समाजातील होती. 22 वर्षांच्या रिबिकाचा अन्सारी याच्याशी एक महिन्यापूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर सातत्याने दोघांमध्ये भांडणे होत असत. अखेर त्याने तिची निर्घृण हत्या केली. रिबिका ही अन्सारी याची दुसरी पत्नी होती. तिच्या माहेरच्या लोकांचा या विवाहाला ठाम विरोध होता. आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
इलेक्ट्रीक कटरचा उपयोग
अन्सारी याने चार दिवसांपूर्वी शुक्रवारी रिबिकाची गळा धारदार शस्त्राने कापून हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे त्याने इलेक्ट्रीक कटरचा उपयोग करुन केले. ही शस्त्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आहेत, असे आतापर्यंतच्या तपासातून आढळल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. हे क्रूर कृत्य आरोपीने एकटय़ाने केले की, त्याचे अन्य कोणी सहकारी होते, याचाही शोध घेतला जात आहे. रिबिकाच्या कुटुंबियांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.
जेहादी मनोवृत्तीतून हत्या ?
इतक्या क्रूरपणे अन्सारी याने रिबिकाची हत्या का केली याचा तपास पोलिसांनी चालविला आहे. झारखंडमध्ये विरोधी पक्ष कसणाऱया भाजपने या हत्येसाठी जेहादी मनोवृत्ती कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे राजकीय दबावाखाली न येता खणून काढावीत आणि सत्य बाहेर आणावे. या हत्येमागे मोठे कारस्थान असू शकते, असा आरोप भाजपने केला.









