वार्ताहर / किणये
पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. याचे कामकाज जोमाने सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथऱ्याचा स्लॅबभरणी पूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. हे कामकाज करण्यासाठी गावातील वडीलधारी मंडळींसह तरुणवर्ग एकवटला आहे. अगदी एकोप्याने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्यासाठी तरुण अहोरात्र कार्य करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
छत्रपती शिवरायांची अश्वारूढ मूर्ती उभारण्यासाठी चौथाऱ्याचे कामकाज सुरू असून शुक्रवारी या चौथऱ्याचा स्लॅबभरणी पूजन कार्यक्रम झाला. हे स्लॅबभरणी पूजन खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इस्कॉनचे नागेंद्र प्रभुजी हे उपस्थित होते. त्यांनी सध्याच्या समाजाला अध्यात्माची जोड कशी हवी. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार तरुणांनी आत्मसात करणे गरजेचे आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
गावच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती उभारण्यात येणार आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण या गावातील कार्यकर्त्यांसाठी व गावासाठी आणि गावच्या विकाससाठी कार्य करणार असल्याचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी मंगेश पवार, प्रशांत कंग्राळकर रमेश हुलीयार आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यामुळे परिसर दणाणून गेला होता. गावातील पंचकमिटी, ट्रस्ट कमिटीचे सदस्य व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.









