सेन्सेक्स 594 अंकांनी तेजीत : एफएमसीजी निर्देशांक दबावात
मुंबई :
सोमवारी अल्पशा घसरणीसोबत बंद झालेल्या भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी चांगली तेजी अनुभवलेली दिसून आली. विशेषत: सेन्सेक्स 594 अंकांनी वाढत बंद झालेला दिसला. अमेरिका व भारत यांच्या व्यापार कराराबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसला. विविध निर्देशांकांच्या कामगिरीत एफएमसीजी वगळता इतर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक सकारात्मक बंद झाले.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 594 अंकांनी वाढत 82380 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 169 अंकांनी वाढत 25239 अंकांवर बंद झाला होता. बँक निफ्टी निर्देशांक 259 अंकांनी तेजीसह 55148 च्या स्तरावर बंद होण्यात यशस्वी झाला. बँक निफ्टी निर्देशांक सलग दहाव्या दिवशी तेजीसह बंद झाला आहे. निफ्टीतील 50 पैकी 41 समभाग तेजीवर स्वार होते. निफ्टी स्मॉलकॅप100 171 अंकांनी वाढत 18298 अंकांवर तर निफ्टी मिडकॅप100 313 अंकांनी वाढत 58799 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीत कोटक महिंद्रा बँक, लार्सन टुब्रो, महिंद्रा आणि महिंद्रा व मारुती सुझुकी यांचे समभाग दमदार तेजीसह बंद झाले तर याउलट एशियन पेंटस्, श्रीराम फायनान्स, नेस्ले इंडिया व बजाज फायनान्सचे समभाग घसरणीत राहिले होते. रिलायन्स इंडस्ट्रिज, टीसीएस यांचे समभागही तेजीत होते. सेन्सेक्समध्ये भारती एअरटेलचे समभाग तेजीत तर एचडीएफसी बँक व एचयुएलचे समभाग मात्र घसरणीत होते. अमेरिकेतील बाजारात तेजी दिसून आली असून आजपासून दोन दिवस फेडरल रिझर्व्हची बैठक सुरु होत असून त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. ऑटो आणि रियल्टी क्षेत्रातील समभागांची खरेदी गुंतवणूकदारांनी मंगळवारी केल्याचे दिसून आले.
सोमवारी निक्केई पहिल्यांदाच 45 हजाराचा आकडा पार करु शकला आहे. यामुळे आशियाई बाजारात तेजीचा सूर होता. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या आधी अमेरिकेतील बाजार तेजीसह बंद झाले. एस अँड पी500 0.5 टक्के व नॅस्डॅक कम्पोझीट 0.9 टक्के वाढीसह विक्रमी स्तरावर बंद झाला होता. डोव्ह जोन्स तेजीत होता. युरोपातील बाजारात घसरण होती. हँगसेंग घसरणीत तर कोस्पी तेजीत होता.









