वृत्तसंस्था / चंदीगढ
पंजाबमधील एक कुप्रसिद्ध गुंड आणि अमली पदार्थांचा दलाल अमृतपाल सिंग याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. या राज्याच्या जंडियाला गुरु नगर परिसरात पोलिसांशी त्याची चकमक बुधवारी झाली. या चकमकीत त्याला ठार करण्यात आले, अशी माहिती पंजाबच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
त्याने दडविलेला अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यासाठी पोलिसांनी त्याला एका ठिकाणी नेले होते. या ठिकाणाची माहिती सिंग यानेच दिली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या ठिकाणी शस्त्रसाठाही असल्याचे सिंग याने स्पष्ट केले होते. मात्र, त्याला घेऊन पोलीस तेथे गेल्यानंतर त्याने त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथे ठेवलेल्या शस्त्रांच्या साहाय्याने पोलिसांवर त्याने गोळीबारही केला, अशी माहिती देण्यात आली. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याला गोळी घातल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अमृतपालसिंग हा कुख्यात गुंड आणि गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या होता. त्याच्यावर हत्या करणे, हत्या करण्याचा प्रयत्न करणे असे अनेक गुन्हे होते. पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर झालेल्या ठिकाणाहून 2 किलो हेरॉईन आणि पिस्तूल हस्तगत केले आहे. पुढील चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.









