पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट : इतर नेत्यांकडूनही काँग्रेसवर हल्लाबोल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशात आणीबाणी लागू होऊन 48 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीला विरोध करताना दिवंगत झालेल्यांना श्र्रद्धांजली वाहिली. ‘ज्यांनी आणीबाणीला विरोध केला आणि देशातील लोकशाहीची भावना मजबूत करण्यासाठी काम केले त्यांना मी श्र्रद्धांजली अर्पण करतो’ असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आणीबाणी हा आपल्या देशाच्या इतिहासातील न विसरण्यासारखा क्षण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भाजप अध्यक्षांनीही गांधी कुटुंबाला घेरले
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांनीही आणीबाणीची आठवण करून ट्विट केले आहे. ‘25 जून 1975 रोजी एका कुटुंबाने आपल्या हुकूमशाही वृत्तीमुळे देशातील महान लोकशाहीची हत्या केली आणि आणीबाणीसारखा कलंक लावला. अशा कठीण काळात अपार यातना सहन करून लोकशाहीच्या स्थापनेसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व देशभक्तांना मी नमन करतो’ असे ट्विट न•ा यांनी केले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही आणीबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
आरएसएसच्या मुखपत्रात इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’ने आणीबाणीच्या 48 व्या वर्षपूर्तीनिमित्त देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा हिटलरशी केली आहे. ‘पांचजन्य’च्या मुखपृष्ठावर हिटलर आणि इंदिरा गांधी यांचा फोटो समोरा-समोर लावण्यात आला असून त्याच्याखाली ‘हिटलर गांधी’ असे ठळक शीर्षक देण्यात आले आहे. या मासिकामध्ये ‘तानाशाह इंदिरा’सह अन्य काही लेखांतून आणीबाणीवर तपशीलवार प्रकाश टाकण्यात आला आहे. इंदिरा गांधींच्या सरकारने 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. ही आणीबाणी 21 महिने म्हणजे 21 मार्च 1977 पर्यंत चालली. इंदिरा गांधींनी घटनेच्या कलम 352 नुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करून देशात आणीबाणी लागू केली होती.









