प्रवाशांमधून आनंद व्यक्त : रेल्वे इंजिनला हार घालून स्वागत
बेळगाव : बेळगावमधून पहिल्यांदाच विद्युत इंजिनवर रेल्वे धावली. बेळगाव-हैदराबाद-मनुगुरु एक्स्प्रेस इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हच्या साहाय्याने धावली. पहिल्यांदाच बेळगाव रेल्वेस्थानकामधून इलेक्ट्रिक इंजिनवर रेल्वे धावल्याने प्रवाशांमधून आनंद व्यक्त करण्यात आला. काही प्रवाशांनी रेल्वे इंजिनला हार घालून स्वागत केले. पुणे ते लोंढा यादरम्यानच्या रेल्वेमार्ग विद्युतीकरणाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू होते. विद्युतीकरणामुळे रेल्वेची गती वाढणार असून प्रदूषणही टाळता येणार आहे. देशाच्या इतर भागात विद्युत इंजिनवर रेल्वे धावत असताना बेळगावचे काम मात्र धिम्यागतीने सुरू होते. यापूर्वी हुबळी-लोंढा मार्गावर विद्युत इंजिनवर रेल्वे धावली होती. त्यामुळे बेळगावचे काम केव्हा पूर्ण होणार याची प्रतीक्षा होती.
मागील महिन्याभरापासून बेळगाव रेल्वेस्थानक ते अनगोळपर्यंतच्या विद्युतीकरणाचे काम सुरू होते. विद्युतवाहिन्या ओढणे, जंक्शन बसविणे अशी कामे सुरू होती. लोंढा ते पुढील काम पूर्ण झाले असले तरी बेळगाव-लोंढा हे काम रखडले होते. लोंढ्याजवळ घनदाट जंगल असल्यामुळे विद्युतीकरणाच्या कामात अडथळे निर्माण होत होते. नैर्त्रुत्य रेल्वेने युद्धपातळीवर हे काम पूर्ण केले आहे. मंगळवारी दुपारी 1 वा. बेळगाव-मनुगुरु एक्स्प्रेस विद्युत इंजिनवर धावली. पहिल्यांदाच बेळगावमधून विद्युत इंजिनवर रेल्वे धावत असल्याने प्रवासी तसेच रेल्वेचे कर्मचारीही आनंदित होते. त्यामुळे यापुढील काळात बेळगाव ते बेंगळूर मार्गावर विद्युत इंजिनवर रेल्वे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे रेल्वेची गती वाढण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.









