गोंधळी गल्ली येथील घटना : दुचाकीस्वार भामट्यांचे कृत्य
बेळगाव : मॉर्निंग वॉक संपवून घरी परतणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन भामट्यांनी पळविली आहे. शुक्रवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास गोंधळी गल्ली येथे ही घटना घडली असून खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. आशा सहदेव पाटील (वय 78) रा. गवळी गल्ली या शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी फिरायला गेल्या होत्या. फिरून गवळी गल्ली येथील घरी परतताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी या वृद्धेला गाठले. तिच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन हिसकावून घेऊन त्यांनी पलायन केले. सीसीटीव्ही फुटेजवरून भामट्यांचा शोध घेण्यात येत आहे.
घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजनराजे अरस, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. आशा यांचा मुलगा विनोद यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. भामट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गुन्हेगार परराज्यातील आहेत की स्थानिक याची माहिती मिळविण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन भामट्यांचा माग काढण्यात येत आहे. खासकरून पहाटे किंवा सकाळी चेन स्नॅचिंग करणारे गुन्हेगार इराणी टोळीतील असतात. घराबाहेर सडा-रांगोळी करणाऱ्या महिलांना गाठून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील दागिने पळविण्याच्या घटना पहाटे किंवा सकाळीच घडतात. फिरून घरी परतणाऱ्या आशा या एकट्या असल्याचे बघून गुन्हेगारांनी त्यांना गाठल्याचे सामोरे आले आहे.









