हिंडलगा-आंबेवाडी रस्त्याच्या वळणावर गतिरोधक नसल्याने अपघातात वाढ
वार्ताहर /हिंडलगा
हिंडलगा येथील आंबेवाडी, मण्णूर क्रॉसजवळ भरधाव ट्रकची ठोकर बसल्याने दुचाकीस्वार वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 10 रोजी दुपारी घडली. खाचू कडोलकर (रा. हिंडलगा) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार खाचू कडोलकर हे आपल्या दुचाकीवरून कलमेश्वरनगरहून बॉक्साईट रस्ता क्रॉस करून हिंडलगा येथील आपल्या घरी जात होते. या दरम्यान आंबेवाडी-मण्णूर क्रॉसवरील वळणाजवळ बेळगावच्या दिशेने जाणाऱया भरधाव मालवाहू ट्रकची (एमएच 09- सीयू 7957) दुचाकीला जोराची धडक बसली. यावेळी कडोलकर यांच्या पायावरून चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवानेच त्यांचे प्राण वाचले असून परिसरातील नागरिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन जखमीला मदत केली. अधिक उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन महिन्यांत पाचवेळा अपघात काही दिवसांपूर्वीच बॉक्साईट रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. पण डांबरीकरण करताना संबंधित कंत्राटदाराने सुळग्याहून वैभवनगरकडे व हिंडलग्याहून सुळगा गावाकडे जाणाऱया रस्त्यावर गतिरोधक घातले नाहीत. यामुळे रस्ता चकाचक झाल्याने वाहने सुसाट धावत असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच तेथून प्रवास करावा लागत आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांत बॉक्साईट रोडवरील आंबेवाडी-मण्णूर क्रॉसजवळ आतापर्यंत पाचव्यांदा अपघात झाला आहे. यामध्ये मण्णूरच्या महिलेसह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व अपघात फक्त रस्त्यावर गतिरोधक व सूचना फलक नसल्यानेच होत असल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांतून होत आहे. याबाबत अनेकदा मागणी करूनदेखील लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी गतिरोधक बसविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्वरित गतिरोधक न बसविल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.









