सोळांकूर परिसरात हळहळ
सरवडे / प्रतिनिधी
सोळांकूर ता.राधानगरी येथील प्रसिद्ध कापड व्यापारी भिकाजी महादेव वर्णे (वय ७५) व लक्ष्मी भिकाजी वर्णे (वय७०) या वृध्द दांपत्याने तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली असून पण आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट झाले नाही. सदर घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वर्णे दांपत्य हे सोळांकूर गावात गेली ५० वर्षे कापड व्यापार करीत होते. ते आपल्या मुलासह रहात होते. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते गावात दुसऱ्या घरात राहत होते. कोणी घरी नसल्याने दुपारी अचानक या दांपत्याने दाराला कडी लाऊन तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ दार न उघडल्याने चौकशी व पाहणी केली असता दोघांनीही गळफास लावून घेतल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
दोघांच्या मृतदेहांचे सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून ते नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नजीर खान,सचिन पार्टे,व गणेश पाटील करत आहेत.
सोळांकूर परिसरात हळहळ
सोळांकूर गावात गेल्या ५० वर्षापासून भिकाजी वर्णे यांचे दुकान आहे. या दुकानात त्यांची पत्नी लक्ष्मी या देखील असायच्या. पती,पत्नी दोघे कायम दुकानात असायचे त्यामुळे सोळांकूर परिसरातील अनेक गावातील ग्राहकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते.आज अचानक त्यांच्या आत्महतेची बातमी परिसरात पसरली. शांत व प्रेमळ स्वभावाच्या पती, पत्नीने अचानक आत्महत्या केल्याने सोळांकूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









