खेड / राजू चव्हाण :
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवरून विविध प्रकारे जनजागृती केली जात असतानाच शहरातील बॉम्बे जनरल स्टोअर्सचे मालक व हरहुन्नरी कलाकार अभय मंगेश पाटणे या तरुणाने कागदी पुठ्याच्या चटईतून इको फ्रेंडली मखर साकारत पर्यावरण संतुलनाचा नवा संदेश दिला आहे. अमित टाकेकर यांच्या संकल्पनेतून त्याने साडेतीन फूट उंची आणि पाच फूट रुंदीचा साकारलेले मखर साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पासाठी सगळेच जण डोळ्याचे पारणे फेडणारी विद्युत रोषणाई, आरास अन् लक्षवेधी देखावे बनवतात. दरवर्षी नाविन्यपूर्ण अन् पर्यावरणपूरक मखर साकारून साऱ्यांच्याच कौतुकास पात्र ठरणाऱ्या अभय पाटणे याने कागदी पुठ्याच्या चटईतून मखराची निर्मिती केली आहे. २५ किलोहून अधिक कागदी पुठ्याचा वापर करत त्याने साकारलेला मखर लक्षवेधी ठरला आहे.
दरवर्षी नवनव्या कल्पनेतून आगळेवेगळे मखर साकारणाऱ्या अभय पाटणे याला पुठ्ठयातून चटईचा मखर साकारण्यासाठी पंधरा दिवस मोजावे लागले. यासाठी त्याला पत्नी अस्मिता, कन्या पाल्वी, चिरंजीव अर्थ, समीप व आईने तितकाच हातभार लावल्याचे तो सांगतो. गणरायाच्या आगमनाची चाहुल लागताच प्रत्येक गोष्टीत वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न करणारा अभय पाटणे दरवर्षी प्रबोधनात्मक मखर साकारून साऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो.
आजवर त्याने नानाविध प्रबोधनात्मक मखराच्या कलाकृती साकारत यातून संदेश देण्याची परंपरा कायम जपली आहे. काही वर्षापूर्वी त्याने १० किलो रद्दीपासून साकारलेले मखर आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. टाकाऊ बांगड्यातून साकारलेले मखरही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. हंपी येथील प्रसिद्ध दगडी रथाची प्रतिकृती, ६ फुटी दीपस्तंभ, अक्षरधाम, कागदी ग्लासातून इको फ्रेंडली मखर आदी कलाकृती सरस ठरल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर कागदी पुड्यातून साकारलेली चटईची कलाकृती साऱ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. हे मखर पाहण्यासाठी गणेशभक्तांची त्यांच्या निवासस्थानी एकच गर्दी उसळत आहे. याच मखरात शाडूच्या मातीपासून तयार केलेली गणरायाची सुबक मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.
- विसर्जनानंतर जलचर प्राण्यांना खाद्य मिळेल
शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणरायाच्या मूर्तीच्या पोटात जलचर प्राण्यांसाठी ५ प्रकारचे धान्यही ठेवण्यात आले आहे. जेणेकरून गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर जलचर प्राण्यांना खाद्य मिळेल.
– अभय पाटणे, बाजारपेठ, खेड.








