मागणीत वाढ : पूजा-अर्चा, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
बेळगाव : श्रावणाच्या पार्श्वभूमीवर विविध फुलांची आवक वाढली आहे. अशोकनगर येथील फूल मार्केटमध्ये खरेदीसाठी पहाटे गर्दी होऊ लागली आहे. श्रावण महिना व्रतवैकल्यांचा म्हणून ओळखला जातो. त्याबरोबरच पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांचेही मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. त्यामुळे फूल मार्केट आणि किरकोळ बाजारात फुलांची आवक वाढू लागली आहे. 17 ऑगस्टपासून निजश्रावण मासाला प्रारंभ झाला आहे. दर सोमवारी शिवालयांमध्ये दर्शनासाठी वर्दळ वाढू लागली आहे. त्याबरोबरच श्रावणी शुक्रवारीही वरमहालक्ष्मी पूजन होऊ लागले आहे. त्यामुळे बाजारात फुलांची मागणी वाढत आहे. यासाठी फूल मार्केटमध्ये अधिक प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची फुले दाखल होऊ लागली आहेत. मागणीबरोबरच आवकही वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे फुलांच्या विक्रीतून उलाढाल होऊ लागली आहे. श्रावण महिन्यापासून हिंदू सणांना प्रारंभ होतो. या महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याबरोबरच विविध मंदिरांतून पूजा आणि इतर कार्यक्रम होत असतात. त्यामुळे फुलांची मागणी अधिक प्रमाणात वाढली आहे. गुलाब, पिंक गुलाब, शेवंती यासह इतर फुलेही मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ लागली आहेत. त्यामुळे फूल मार्केटमध्ये फुलांची रेलचेल दिसू लागली आहे.









