काहीच हाती न लागल्याने साहित्याची नासधूस
प्रतिनिधी /बेळगाव
बेकिनकेरे येथे रविवारी दुपारी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. गणपत गल्ली येथील परशराम बाळू भोगण यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करत ऐवज शोधण्यासाठी घरगुती साहित्याची नासधूस केली आहे. दरम्यान, चोरांना हाती काहीच किमती ऐवज न लागल्याने दरवाजा आणि इतर साहित्याचे नुकसान केले आहे. या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागनाथ मंदिरात घडलेली चोरीची घटना ताजी असताना गावात पुन्हा चोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ माजली आहे.
भोगण कुटुंबीय शेताकडे गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी दुपारी 4 वाजता दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. मात्र, घरात कोणतीच किमती वस्तू सापडली नसल्याने घरातील भांडी आणि इतर साहित्यावर राग काढला. घरात सोन्या-चांदीचा ऐवज किंवा रोख रक्कम न मिळाल्याने साहित्य विस्कटून चोरट्यांनी पलायन केले आहे. चोरटे घरात असतानाच परशराम यांचा लहान मुलगा घरात आला. दरम्यान, त्याच्या येण्याची चाहूल चोरट्यांना लागताच त्यांनी पाठीमागील दरवाजातून पलायन केले. महत्त्वाचे म्हणजे दिवसाढवळ्या चोरीचा प्रयत्न झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाय गावात चोऱ्यांचे प्रकार वाढू लागल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. शुक्रवारी नागनाथ मंदिरातील साडेपाच किलो चांदीचा मुकुट चोरट्यांनी पळविला होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी भोगण कुटुंबीयांच्या घरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. केवळ दोन दिवसात चोरीच्या घटना समोर आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
गावात दिवसा चोर घरात शिरत असल्याने आता ग्रामस्थांनी सावध राहणे गरजेचे आहे. शिवाय परिसरात चोऱ्या वाढल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. चोरटे कडीकोयंडा आणि दरवाजे तोडून चोऱ्या करत असल्याने गावच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने गावात सतर्कता निर्माण करणे गरजेचे बनले आहे.









