कठोर कारवाईची पोलीस आयुक्तांची तंबी
बेळगाव : समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून शहराच्या शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कॅम्प व शहापूर परिसरात रविवारी दोन घटना घडल्या असून यासंबंधी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजमाध्यमाचा दुरुपयोग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. गणेशोत्सव व ईद-ए-मिलादनंतर शांत असलेल्या बेळगावच्या शांततेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी समाजमाध्यमाचा वापर करण्यात येत आहे. कॅम्प व शहापूर पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. समाजमाध्यमावर जातीय तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आले आहेत.
यासंबंधी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्याशी संपर्क साधला असता तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. असे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, नवरात्रोत्सवानिमित्त बेळगावात सुरू असलेल्या दुर्गामाता दौडच्या पार्श्वभूमीवरही पोलिसांनी व्यापक खबरदारी घेतली असून दौड मार्गावर श्वानपथक व स्फोटक तज्ञांकडून तपासणी केली जात आहे. सोमवारी पहाटे अनगोळ परिसरात स्फोटकशोधक पथक व श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गावर पाहणी करण्यात आली.