शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय आल्यास हिसका दाखवू
► प्रतिनिधी/ बेळगाव
रिंगरोडविरोधात शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या आहेत. असे असताना रिंगरोडचा सर्व्हे करण्यासाठी तसेच आरेखन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अद्याप आम्ही कोणत्याही प्रकारची संमती दिली नाही. मात्र सर्व्हे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जर शेतकऱ्यांची परवानगी न घेता शेतात पाय ठेवला तर शेतकरी हिसका दाखवतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
रिंगरोडला नेहमीच विरोध केला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. असे असताना सर्व्हे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बाची तसेच संतिबस्तवाड परिसरात अधिकारी जाऊन आरेखन करत आहेत. काही शेतकऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मात्र रस्त्यामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना याबाबत कोणतीच माहिती दिली गेली नाही. ते शेतकरी अनुपस्थित होते. त्यामुळे नेमके आरेखन कोणी केले? हे समजणे अवघड झाले आहे.
बेळगाव तालुक्यातील 32 गावांतील जमीन या रिंगरोडमध्ये जाणार आहे. जवळपास 1200 एकरहून अधिक सुपीक जमिनी जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. असे असताना अचानकपणे अधिकारी येऊन सर्व्हे करत आहेत. शेतकऱ्यांना याची माहिती सध्यातरी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. जर शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सर्व्हे करण्यासाठी आले तर त्यांना जाब विचारण्यात येईल, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.









