के. के. कोप्प येथील घटना : जखमीला सिव्हिलमध्ये दाखल
बेळगाव : जमिनीच्या वादातून एका महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवार दि. 18 रोजी के. के. कोप्प (ता. बेळगाव) येथे घडली. जखमी महिलेला सिव्हिलमध्ये दाखल केले असून कलावती सिद्धाप्पा अक्कन्नवर (वय 48) असे तिचे नाव आहे. या प्रकरणी बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. के. के. कोप्प गावातील जमिनीच्या वादातून कलावती यांच्या अंगावर काहींनी ट्रॅक्टर घालून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतात काम करत असताना अचानक अंगावर ट्रॅक्टर चालविण्याचा प्रयत्न झाल्याने त्या जखमी झाल्या. लागलीच त्यांना सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिव्हिलला भेट देण्यासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेबद्दल एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.









