खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे प्रतिपादन : निपाणीत खासदार क्रिकेट चषक स्पर्धेस प्रारंभ
निपाणी : शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ आवश्यक आहेत. हे लक्षात घेऊन युवा पिढीसाठी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. खासदार चषक स्पर्धेतून युवकांची क्रिकेट खेळाची आवड जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत हा उद्देश आहे. सदर स्पर्धेचा क्रिकेट शौकिनांनी लाभ घेण्याचे आवाहन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. निपाणीत म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर टॉप स्टार क्रिकेट क्लब यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. स्वागत क्लबचे अध्यक्ष मैनुद्दीन मुल्ला यांनी केले. यावेळी खासदार जारकीहोळी यांनी, सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध खेळांमधील उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे.
यासाठीच ठिकठिकाणी स्पर्धा भरवल्या जात आहेत. बेळगाव येथे गेल्या महिन्यात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. अशा स्पर्धांचा लाभ घेऊन खेळाडूंनी प्रगती साधावी, असे आवाहन केले. प्रारंभी खासदार जारकीहोळी यांच्या हस्ते यष्टीपूजन कऱण्यात आले. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकु पाटील, किरण राजपूत, भून्याय मंडळ सदस्य अब्बास फरास, नगरसेवक शेरू बडेघर, जरारखान पठाण, प्रा. राजन चिकोडे, ॲड. एस. एस. चव्हाण, क्लबचे उपाध्यक्ष शिरीष कमते, स्पर्धा कमिटी अध्यक्ष दिलीप घाटगे, राजू नाईक, अनिल भोसले, यासीन मणेर, किरण पाटोळे यांच्यासह मान्यवर, क्लबचे सदस्य, क्रिकेटशौकीन उपस्थित होते.
पाच दिवस रंगणार सामने
खासदार चषक स्पर्धेत निपाणी व चिकोडी तालुक्यातील एकूण 16 संघांनी सहभाग घेतला आहे. पाच दिवस 24 सामने होणार असून रविवार 18 रोजी अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास 1 लाख रुपये, उपविजेत्या संघास 50 हजार रुपये आणि तृतीय, चतुर्थ क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी 15 हजार रुपये व कायमस्वरूपी चषक असे बक्षीस दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त अनेक वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.









