काशीमध्ये 41 देशांच्या 700 प्रतिनिधींकडून मंथन
वृत्तसंस्था/ वाराणसी
वाराणसी या सांस्कृतिक नगरीत इंटरनॅशनल टेम्पल कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात जागतिक स्तरावर मंदिरांच्या व्यवस्थापनात एकरुपता आणण्यावर चर्चा होत आहे. या तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांच्याहस्ते झाले आहे. यावेळी त्यांनी मंदिरांना भक्तीसोबत शक्तिकेंद्र करावे लागणार असल्याचे म्हटले आहे. मंदिरांचे व्यवस्थापन सरकारने करो किंवा अन्य कुणी त्याने भक्त असणे आवश्यक असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
काशीसारख्या पवित्र स्थळावर जगभरातील छोट्या-मोठ्या सर्व मंदिरांच्या व्यवस्थापनात एकरुपता आणण्यासाठी मंथन सुरू आहे. यात 41 देशांचे हिंदू, शीख, बौद्ध अन् जैन धर्माचे सुमारे 700 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
जगभरातील मंदिरांच्या व्यवस्थापनाशी निगडित चांगल्या बाबींवरून एका अंतिम निर्णयावर पोहोचण्याची तयारी आहे. व्यवस्थापनात एकरुपता आणण्याचे प्रयत्न केला जात आहे.
टेम्पल कनेक्टकडून पहिल्यांदाच इंटरनॅशनल टेम्पल्स कन्व्हेंशन अँड एक्स्पोचे आयोजन होत आहे. हे अध्यामिक नसून मंदिर व्यवस्थापन संचालन अन् प्रशासनाच्या विकासावर आधारित आहे. मंदिरात पूजा-अर्चनेसोबत संचालन व्यवस्था मजबूत करणे हाच प्रमुख उद्देश आहे. लोक मंदिर न्यासाला केवळ धार्मिक दृष्टीकोनातून पाहतात. मंदिर व्यवस्था, संचालनातील व्यवस्थापन अन् प्रशासकीय कामकाज भाविकांना फारसे माहित नसते असे उद्गार टेम्पल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी काढले आहेत.
भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कोणती व्यवस्था केली जाते हे देखील लोकांना माहित असायला हवे. याचमुळे विविध मंदिरांचे विश्वस्त, व्यवस्थापक आणि शासकीय अधिकाऱ्यांना परिषदेकरता आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांसोबत मंदिराची सुरक्षा, देखरेख, निधी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता अन् पावित्र्यासोबत सायबर हल्ल्यांपासून सुरक्षेसाठी अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देण्यावर विचारविनिमय होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सुमारे 57 देशांमध्ये 7 हजार मंदिरांना भेट देत त्यांचे डिजिटलिकरण करण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे. मोठ्या मंदिरांच्या व्यवस्थेबद्दल छोट्या मंदिरांना माहिती पुरविणे उद्देश आहे. विविध पंथ अन् संप्रदायांदरम्यान धार्मिक संतुलन राखण्यासाठी अनेक साधू-संत कार्य करत आहेत. उत्तम व्यवस्थापन महत्त्वपूर्ण असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.









