ईडीच्या कारवाईवर खर्गे यांचे भाष्य
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम आणि राजस्थानमध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. याचदरम्यान राजस्थानमध्ये नुकत्याच ईडीने टाकलेल्या छाप्यांचा वाद आणखी चिघळला आहे. विरोधी पक्ष यापूर्वीच मोदी सरकारवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत आहेत. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत भाजपकडून विरोधी पक्षांना घाबरवण्याचे कारस्थान सुरू असल्याचा दावा केला. तसेच अशा छाप्यांमुळे काँग्रेस घाबरणार नसून एक दिवस भाजपलाही याचा सामना करावा लागेल, असे ते म्हणाले.
आम्ही 50 वर्षांपासून राजकारण करत आहोत, पण निवडणुकीच्या काळात ईडी किंवा सीबीआयने कधीही छापा टाकला नाही. पण आज राजकीय दबावामुळे केंद्रीय तपास यंत्रणा विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाया करत आहेत, असे खर्गे पुढे म्हणाले. याआधी शुक्रवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता. भाजप गुंडगिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. केंद्र सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून देशात दहशत निर्माण केली आहे. भाजपने लोकशाहीत आपली धोरणे, वर्तन आणि तत्त्वे यांच्याद्वारे लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु ते ‘गुंडगिरी’चा अवलंब करत आहेत, असे ते म्हणाले होते.









