अमेरिकेच्या सेंट्रल कमांड फोर्सचे प्रमुख इस्रायलमध्ये दाखल : योग्यवेळी हल्ला करण्याची इराणची धमकी
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इराण इस्रायलवर सोमवारी हल्ला करण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. इराणकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याला रोखण्यासाठी इस्रायलला अमेरिकेकडून मदत केली जात आहे. यानुसार अमेरिकेच्या सेंट्रल कमांड फोर्सचे प्रमुख जनरल मायकल कुरेला हे तेल अवीव येथे पोहोचले आहेत. तर धोका पाहता अमेरिकेकडून मध्यपूर्वेत स्वत:च्या शस्त्रास्त्रांची तैनात वाढविण्यात आली आहे.
अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉननुसार मध्यपूर्वेत तैनात अमेरिकेचे सैनिक आणि इस्रायलच्या रक्षणासाठी नवी लढाऊ विमाने, डिस्ट्रॉयर्स आणि विमानवाहू नौका पाठविण्यात येत आहे. इस्रायलचे रक्षण करणार असल्याचे आश्वासन अमेरिकेने दिले आहे.
तत्पूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यात तणाव दिसून आला. दोघांदरम्यान हानियेहच्या हत्येनंतर गुरुवारी फोनवरून चर्चा झाली होती. यादरम्यान बिडेन यांनी नेतान्याहू यांना चांगलेच सुनावले असल्याचे समजते. हानियेहच्या हत्येच्या टायमिंगवरून बिडेन यांनी प्रश्न उपस्थित केला. या हत्येमुळे शस्त्रसंधीच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे. तर त्यांचे सर्व आरोप नेतान्याहू यांनी फेटाळले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांचे महत्त्व कमी लेखू नका असे बिडेन यांनी नेतान्याहू यांना सुनावले. तर इस्रायलने हानियेहला इराणमध्ये ठार करण्याच्या प्लॅनिंगची माहिती अमेरिकेला दिली होती असे बोलले जात आहे.
अमेरिकेची इस्रायलला साथ : इराण
तेहरानमध्ये हानियेह ज्या निवासस्थानात वास्तव्यास होता, त्याला थेट क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे लक्ष्य करण्यात आले. हानियेहच्या हत्येसाठी क्षेपणास्त्र हल्ला इस्रायलने करविला असून यात अमेरिकेच्या प्रशासनाची मदत मिळाली आहे. हानियेह ज्या अतिथीगृहात वास्तव्याला होता, त्याच्या बाहेरूनच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप इराणच्या सुरक्षा दलाने केला आहे.
योग्य वेळी अन् योग्य ठिकाणी हल्ला
हनियेहच्या हत्येचा सूड उगविला जाणार आहे. दुस्साहसी आणि दहशतवादी ज्यू शासनाला कठोर शिक्षा केली जाणार आहे. योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी आम्ही सूड घेऊ असा पुनरुच्चार इराणने केला आहे. तर हनियेहच्या हत्येप्रकरणी इस्रायलने अद्याप मौन बाळगले आहे. आयआरजीसीच्या धमकीनंतर इस्रायलने कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तर इराणमध्ये होणाऱ्या हल्ल्याची कुठलीच पूर्वकल्पना नव्हती असे अमेरिकेने स्पष्टीकरण दिले आहे.
हत्येचा याआधीही होता प्रयत्न
हानियेहला ठार करण्यामागे इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादचा हात असल्याचा दावा ब्रिटिश प्रसारमाध्यम द टेलिग्राफने केला आहे. मोसाद इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसीच्या अंत्यसंस्काराच्या दिनीच हानियेहची हत्या करू इच्छित होती. परंतु तेव्हा लोकांची मोठी गर्दी झाल्याने तो प्रयत्न यशस्वी ठरण्याची भीती होती, यामुळे तो प्रयत्न टाळण्यात आला होता.
हिजबुल्लाहकडूनही धमकी
हानियेहच्या मृत्यूनंतर पूर्ण मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. याचदरम्यान हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाहने इस्रायलचा सूड उगविणार असल्याचे जाहीर केले आहे. सध्या इस्रायली लोक अत्यंत आनंदी आहेत, परंतु आगामी दिवसांमध्ये ते खूप रडतील असे म्हणत नसरल्लाहने सर्व आघाड्यांवर खुल्या लढाईची घोषणा केली आहे. इस्रायलने लक्ष्मणरेषा ओलांडरी आहे. आम्ही या मृत्यूंवर कशाप्रकारे प्रत्युत्तर देऊ याची इस्रायलींना कल्पनाच नाही असेही त्याने म्हटले आहे.









