आरटीओ कार्यालयाच्या परिसरात धक्कादायक घटना : उचापतीखोर वाहन निरीक्षकासह, एजंट, चालक संशयाच्या भोवऱ्यात
प्रतिनिधी/गोडोली
गेली पाच महिन्यांपासून आरटीओ कार्यालय (RTO Office) आणि परिसरात एका वाहन निरीक्षकाच्या (RTO Inspector) उचापती चांगल्याच वाढल्या आहेत. वाहन निरिक्षकासह एक एजंट आणि त्यांच्या गाडीचा चालक सतत कार्यालयातील कामकाजाबाबत आक्षेपार्ह शब्द वापरतात. अरेरावीची भाषा, उद्धट बोलणे, पैशाशिवाय काम न करणाऱ्या या वाहन निरीक्षकाने शिरवळ जवळ कर्तव्य बजावत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अंगावर इनोव्हा गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यात चालकाने प्रसंगावधान राखत चार जणांचा जीव वाचवल्याची चर्चा आरटीओ कार्यालयाच्या परिसरात ऐकायला मिळत आहे. मात्र संबंधितांवर कारवाई की गुन्हा दाखल झाला याची माहिती मिळू शकली नाही.
ऐतिहासिक साताऱ्याचा (satara) सर्वाधिक महसूल, कार्यालयीन कामकाजात सर्वोत्तम कामगिरी करून आरटीओ कार्यालयाने राज्यात लौकिक वाढवला आहे. मात्र गेल्या एक वर्षापासून याच कार्यालयातील एक वाहन निरीक्षक हा नाना उचापती करत असल्याचे समोर आले आहे. पैशासाठी वाट्टेल ते करत पैशाची अमिष दाखवून फुटकळ कार्यकर्त्यांना हातीशी धरुन कार्यालयाची बदनामी, वरिष्ठांचा अवमान, अन्य अधिकायांशी उद्धट वागणत वातावरण दुषित केल्याचे सतत ऐकायला मिळत होते. कार्यालयाच्या परिसरात काही एजंट मंडळींना हाताशी धरून त्या निरिक्षकांने अनेक उचापती करत परिसरात अ ‘संतोष’ वाढविल्याची चर्चा होताना ऐकायला मिळते.
चार दिवसांपूर्वी या कार्यालयाचे प्रमुख शिरवळ परिसरात कर्तव्य बजावण्यासाठी निघालेल्या कार्यालयाच्या वाहनातून जात असताना त्या वाहनाला ‘ या ‘ वाहन निरीक्षकाने इनोव्हा गाडीतून सलग जोरात व्हॉर्न वाजवत काही अंतर पाठलाग केला. गाडीला जोरदार धडक देऊन घातपात करण्याचा तीन वेळा असफल प्रयत्न केला. यात चालकांने प्रसंगावधान राखत गाडीतील स्वतः सह तीन अधिकाऱ्यांचा जीव वाचवला.
एवढा गंभीर प्रसंग घडून ही त्या वाहन निरीक्षकावर कोणतीही कारवाई वरिष्ठांनी अद्यापही केली नाही.तर कर्तव्य बजावत असणाया आरटीओ कार्यालयाच्या चौघांचा अपघात करून घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न होऊन ही कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत आरटीओ कार्यालयाच्या परिसरात जोरदार चर्चा सुरू असून जबाबदार अधिकारी याबाबत माहिती देण्याचे टाळत आहेत.
ड्युटी कोल्हापुरात तर घातपात शिरवळ येथे
सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक हद्दीवर कर्तव्य बजावत असताना तो वाहन निरीक्षक हा एका अ’संतोषी’ एजंटाकडून कार्यालयाच्या परिसरातील इत्यंभूत माहिती मिळवत असतो. तो एजंट हा व्हिडिओ कॉल, शुटींग , मेसेज करत माहिती पुरवतो. याची उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते. कोल्हापूर येथे ड्य़ुटीवर असताना कराड पासिंग असलेल्या इनोव्हा गाडीतून तो वाहन निरीक्षक अन्य दोघांसमवेत होता. वरिष्ठांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या एजंटाने शिरवळ येथे वाहन तपासणीसाठी जाणार असल्याची आणि कार्यालयातून वरिष्ठ बाहेर पडल्याची माहिती काही एजंटांकडून दिली गेली. यामुळे पूर्व तयारी केली असल्याने ड्य़ुटी कोल्हापूर येथे तर घातपात शिरवळ येथे करण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.