रॅमन मॅगसेसे पुरस्कारामुळे डॉ. आर. रवी कन्नन हे नाव सध्या जगभरात चर्चिले जात आहे. कॅन्सरविरुद्धच्या लढाईत एखाद्या योद्ध्याप्रमाणे उभ्या ठाकलेल्या डॉ. कन्नन यांनी आपले आयुष्यच रुग्णांप्रती अर्पण केले आहे. आसामच्या सिल्चर शहरात कचार कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत असणारे डॉ. कन्नन आसाम आणि तेथील कॅन्सर रुग्णांना आपलेपणाने सेवा देत आहेत. त्यांच्या या सेवेसाठी त्यांना यंदा प्रतिष्ठेच्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सध्या डॉ. कन्नन हे 59 वर्षांचे आहेत. 2013 मध्ये वैद्यकशास्त्रासाठीचा ‘महावीर पुरस्कार’ (दहा लाख ऊपये आणि सन्मानपत्र) त्यांना मिळाला. तसेच 2020 मध्ये ‘पद्मश्री’ किताबाने त्यांचा गौरव झाला आहे. ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कारा’मुळे जगाचे लक्ष त्यांच्या कर्तृत्वाकडे वेधले गेले आहे.
इंडियन कॅन्सर सोसायटीच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी 10.3 लाख लोकांना कॅन्सर होतो. 2020 मध्ये कॅन्सरमुळे 8.5 लाख मृत्यू झाले. दर तासाला 7 महिला कॅन्सरने मृत्युमुखी पडतात. प्रत्येक दिवशी 200 लोकांचा मुखाच्या कॅन्सरने मृत्यू होतो. ब्रेस्ट कॅन्सरने दरवर्षी 87 हजार महिलांचा बळी जातो. गरिबी, निरक्षरता आणि जागृतीचा अभाव यामुळे कॅन्सरने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
आसामच्या सिल्चर शहरात कचार कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची (सीसीएचआरसी) स्थापना स्थानिक नागरिकांच्या संस्थेतर्फे करण्यात आली. सरकारने दिलेल्या भूखंडावर सार्वजनिक देणग्या गोळा करून ऊग्णालय सुरू झाले. मात्र, पहिल्या दशकभराच्या वाटचालीत हे रुग्णालय म्हणजे एखादे उपकेंद्र होते. कर्करोगग्रस्त अवयव काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याची सोय येथे उपलब्ध नव्हती. तशा शस्त्रक्रिया करणारा विभाग 2007 मध्ये ‘सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट’ म्हणून डॉ. आर. रवी कन्नन आल्यानंतर सुरू झाला.
सिल्चरला येण्याआधी डॉ. कन्नन हे चेन्नईचे उपनगर अडयार येथील कर्करोग ऊग्णालयात कार्यरत होते. पण वयाच्या 42 व्या वर्षी आसाममधील या ऊग्णालयात केवळ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट नव्हे, तर या ऊग्णालयाचे प्रमुख म्हणूनही काम करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले.
डॉ. कन्नन यांनी चेन्नईच्या किलपॉक मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी घेतली. तर मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली येथून सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये ‘मास्टर ऑफ सर्जरी’ पदवी संपादन केली. डॉ. कन्नन हे अडयार कॅन्सर इन्स्टिट्युटच्या सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख होते. 2006 मध्ये एका सहकाऱ्याच्या विनंतीवरून त्यांनी प्रथमच कचार कॅन्सर हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राला भेट दिली. तेव्हाच ते हॉस्पिटलच्या तत्कालीन संचालकांना भेटले. ज्यांनी त्यांना केंद्राचे प्रमुख म्हणून काम करण्याची ऑफर दिली. त्यानंतर डॉ. कन्नन यांनी चेन्नईतील आपली प्रॅक्टिस सोडली आणि सिलचरमधील कचार कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरद्वारे लोकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2007 मध्ये आपल्या कुटुंबासह आसामला गेले.
आशेचा किरण
आजघडीला डॉ. कन्नन हे आसाम राज्यातील लाखो लोकांसाठी आशेचा किरण बनले आहेत. विशेषत: कर्करोगासारख्या महागड्या आणि ज्यात उच्च मृत्यूदर आहे, अशा आजारासंदर्भातील डॉ. कन्नन यांचे काम एका दीपस्तंभाप्रमाणेच आहे. भारतातील ईशान्य क्षेत्रासारख्या (नॉर्थ ईस्ट रिजन) दुर्गम आणि प्रामुख्याने ग्रामीण आणि कृषी सीमावर्ती प्रदेशात जेथे वैद्यकीय सेवा मिळणे कठीण आहे, अशा ठिकाणी कॅन्सरची समस्या वाढली आहे. 35 दशलक्ष लोकसंख्येमध्ये कर्करोगाचे
प्रमाण जास्त असलेल्या प्रदेशातील आसाममध्ये पहिले कर्करोग ऊग्णालय 1981 पर्यंत नव्हतेच. कचार कर्करोग ऊग्णालय आणि संशोधन केंद्र 1996 मध्ये स्थापन करण्यात आले. आणि त्यासाठी स्थानिकांच्या संस्थेचा पुढाकार होता.
2007 मध्ये सिल्चर हॉस्पिटलचे संचालक बनल्यानंतर डॉ. कन्नन यांनी हॉस्पिटलच्या सेवेचा विस्तार केला. चेन्नईतील अडयार कॅन्सर इन्स्टिट्युटमधील
सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुखपद सोडून डॉ. कन्नन देशाच्या दुर्गम भागातील एका छोट्या हॉस्पिटलमध्ये रुजू होतील, हे एका स्वप्नासारखेच होते.
डॉ. कन्नन सिल्चरच्या ऊग्णालयात आले, तेव्हा डॉक्टर, नर्स वा अन्य कर्मचारी मिळून 23 जणांचे मनुष्यबळ होते. आता तेथे 451 जण कार्यरत आहेत. किमान 20 हजार कर्करोगग्रस्तांवर या ऊग्णालयाने उपचार केले आहेत. याशिवाय कर्करोगशास्त्र (ऑन्कोलॉजी), नैदानिक विकारशास्त्र (पॅथॉलॉजी), किरणशास्त्र (रेडिओलॉजी), सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी), रोगपरिस्थितीविज्ञान (एपिडेमिऑलॉजी), अर्बुद-निबंधन (ट्युमर रजिस्ट्री) आणि उपशामक शुश्रूषा (पॅलिएटिव्ह केअर) अशा अनेक सेवा देणारे 28 विभाग येथे आहेत.
आर्थिक ऐपत नाही म्हणून कोणत्याही ऊग्णाला कर्करोगाचे योग्य उपचार नाकारले जाणार नाहीत. कर्करोगग्रस्त कोणताही ऊग्ण यातना आणि अपमानाने जीवाला मुकू नये. कोणत्याही कुटुंबाला गरिबी आणि दु:खामुळे उपचार टाळावे लागू नयेत, असे ध्येय डॉ. कन्नन यांनी ठेवले.

डॉ. कन्नन आणि त्यांची पत्नी सीता सिलचरमध्ये आले, तेव्हा तेथे प्रचलित कर्करोगाच्या काळजीची परिस्थिती पाहिल्यावर त्यांनी मनाशी ठाम निर्धार केला. आपली इथे जास्त गरज असल्याचे त्यांना वाटले. कॅन्सरबद्दल लोकांना जागऊक करण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यासाठी आणि लवकर निदान शोधण्यासाठी आता डॉ. कन्नन आणि त्यांचे सहकारी कार्यरत आहेत.
एखादा समाज आपल्या आजारी व्यक्तीची काळजी कशी घेतो, हा समाज किती सुसंस्कृत आहे, हे ठरविण्याचा एक महत्वाचा मापदंड मानला जातो. हॉस्पिटलच्या सुऊवातीच्या दिवसांपासून त्यांनी विविध प्रयोग राबविले. तेथील सुमारे 80 टक्के ऊग्ण हे रोजंदारीवर काम करणारे, चहाच्या बागेत आणि शेतीत काम करणारे कामगार आहेत. त्यापैकी 59 टक्के ऊग्णांचे उत्पन्न 10 हजार किंवा त्याहून कमी आहे.
दीर्घकाळ चालणारे उपचार
बराक खोऱ्यातील आसामच्या सिलचर शहराच्या सीमेवर मेहेरपूर येथे हे हॉस्पिटल आहे. जीवनशैलीच्या समस्येमुळे बराक खोऱ्यात कॅन्सरची प्रकरणे अधिक असल्याने कचार जिह्यात कॅन्सर हॉस्पिटलची गरज होती. येथे सुऊवातीपासूनच उपचारांचा खर्च नाममात्र होता आणि त्यानंतर उपचारांसाठी सबसिडी दिली गेली. परंतु
प्रारंभिक भेटीनंतर ऊग्ण पुढील उपचारांसाठी येण्यास टाळाटाळ करत असल्याचे ध्यानात आले. कर्करोगावरील उपचार ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. केमोथेरपी सहा महिन्यांसाठी, रेडिएशन दोन महिन्यांसाठी, त्यानंतर शस्त्रक्रिया आणि उपचार संपेपर्यंत एक वर्ष निघून जाते. पुन्हा साईड इफेक्ट्स आणि थकवा कमी होईपर्यंत आणखी सहा महिने निघून जातात. कुटुंबप्रमुख हॉस्पिटलमध्ये येत असताना त्यांचे कुटुंब उपाशी राहते आणि काही काळानंतर ते येणे बंद करतात, असा अनुभव बऱ्याचदा येत होता.
फॉलोअपसाठी घरी भेटी
रुग्णांच्या दैनंदिन वेतनाची भरपाई करण्यासाठी रुग्णांच्या सोबत असणाऱ्यांना अन्न आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर बराच फरक पडला. 45 टक्के रुग्ण फॉलोअपसाठी परत येत नाहीत, असा अनुभव आल्याने घरी मोफत भेटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता दरवर्षी 900 ऊग्णांच्या घरी भेटी दिल्या जातात. त्यामुळे उपचारांचा अनुपालन दर 80 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
रुग्णालयात आता चार हजारहून अधिक नवीन रुग्णांची संख्या आहे. तर दरवर्षी 25 हजाराहून अधिक रुग्ण फॉलोअपसाठी भेट देत आहेत. दुर्गम ठिकाणी परवडणाऱ्या कॅन्सर सेवेची सुलभता सुधारण्यासाठी आणि ऊग्णांचा प्रवास खर्च वाचविण्यासाठी उपग्रह ऊग्णालये सुरू करण्यात आली आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि राज्य सरकार यांच्यासोबत जागऊकता निर्माण करण्यासाठी आणि लवकर निदान करण्यासाठी आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्यासाठीही एक कार्यक्रम राबविला जात आहे. त्यांचीही चांगली साथ मिळत आहे.
असे आहेत काही भारतीय मानकरी
1958 मध्ये सामाजिक कार्यासाठी विनोबा भावे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर चिंतामण देशमुख, मदर तेरेसा, वर्गिस कुरियन, जयप्रकाश नारायण, सत्यजीत रे, एम. एस. स्वामीनाथन, एम. एस. शुभलक्ष्मी, इला रमेश भट्ट, अरुण शौरी, रवीशंकर, किरण बेदी, टी. एन. शेषन, पांडुरंग आठवले, महाश्वेतादेवी, राजेंद्र सिंह, अरविंद केजरीवाल, पी. साईनाथ, मंदाकिनी आमटे, प्रकाश आमटे, सोनम वांगचूक, रविश कुमार आदी भारतीय या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
आशिया खंडातील ‘नोबेल’
मॅगसेसे पुरस्कार हा आशिया खंडात नोबेल पुरस्कारासमान समजला जातो. फिलिपाईन्सचे पूर्व राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने 1958 पासून हा पुरस्कार दिला जातो. रॅमन मॅगसेसे ट्रान्सफॉर्मेटिव्ह लीडरशिप इन्स्टिट्युट नेमक्या याच कारणासाठी तयार करण्यात आली. आजपर्यंत 344 व्यक्ती आणि संस्थांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. यंदा या पुरस्काराचे 65 वे वर्ष आहे. समाजासमोर आदर्श मूल्यांचा पुरस्कार करण्याच्या दृष्टीने हा पुरस्कार महत्वपूर्ण मानला जातो. विश्वस्त मंडळाद्वारे दरवर्षी निवडलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र, मेडल आणि रोख रक्कम प्रदान केली जातो.
सरकारी सेवा, कार्यकारी, न्यायिक, विधीमंडळ किंवा लष्कर यासह सरकारच्या कोणत्याही शाखेतील सार्वजनिक हितासाठी उत्कृष्ट सेवा, सार्वजनिक सेवा, खासगी नागरिकांद्वारा सार्वजनिक हितासाठी उत्कृष्ट सेवा, सामूदायिक नेतृत्व, वंचितांना पूर्ण संधी आणि चांगले जीवन मिळण्यासाठी मदत करण्याच्या दिशेने समूदायाचे नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य आणि क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्टस्, प्रभावी लेखन, प्रकाशन किंवा छायाचित्रण किंवा रेडिओ, दूरदर्शन, सिनेमा किंवा परफॉर्मिंग आर्टस्चा वापर सार्वजनिक हितासाठी करणे, शांतता आणि आंतरराष्ट्रीय समज, मैत्री, सहिष्णुता, शांतता आणि एकता यांच्या प्रगतीसाठी योगदान आदीसाठी मॅगसेसे पुरस्कार दिला जातो. यात इमर्जंट लीडरशिप श्रेणी 2000 मध्ये सुरू करण्यात आली. आणि फोर्ड फाऊंडेशनच्या अनुदानातून तो देण्यात येतो.
पाठबळाची गरज!

हा पुरस्कार त्या सर्वांचा आहे, ज्यांनी कॅन्सरग्रस्तांचे जीवन सुखकर करण्यासाठी सहकार्य केले. आता राज्याच्या विविध भागात आणि त्रिपुरात लहान ऊग्णालये स्थापन करून कर्करोगग्रस्तांच्या सुश्रुषेचे विकेंद्रीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केला जात आहे. जेणेकरून लोकांना उपचारासाठी ऊग्णालयात पोहोचण्यासाठी लांब प्रवास करावा लागू नये. करीमगंज, हैलाकांडी आणि दिमा हासाओ जिह्यात सॅटेलाईट क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. आम्हाला लोकांच्या जवळ जाऊन प्रतिबंध, उपचार आणि कर्करोगाच्या काळजीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आम्हाला पायाभूत सुविधा आणि उपकरणांसाठी पाठबळाची गरज आहे.
-डॉ. आर. रवी कन्नन
संकलन – राजेश मोंडकर









