नॉर्वेच्या पुरातत्व तज्ञांना एका मंदिरात नॉर्स देवतांच्या छोट्या मूर्ती मिळाल्या असून त्या चौकोनी तसेच सोन्याद्वारे तयार करण्यात आल्या आहेत. या मूर्ती कागदाच्या तुकड्याइतक्या पातळ आहेत. या तुकड्यांवर नॉर्स देवता फ्रोय आणि देवी गर्डला रेखाटण्यात आले आहे. या मूर्ती मेरोविंगियन काळातील असून हा काळ ईसवी सन 550 पासून सुरू होत वायकिंग युगापर्यंत टिकला होता. बळी देण्यासाठी या मूर्तींचा वापर करण्यात आला असावा, असे मानले जात आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ओस्लोनुसार विंग्रोममध्ये होव फार्मनजीक सोन्याचे एकूण 35 तुकडे आढळले आहेत.
सोन्याच्या या तुकड्यांमध्ये छिद्र नाही, यामुळे त्यांचा दागिन्यांप्रमाणे वापर केलेला असण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. सोन्याच्या मूर्तीचा पहिला तुकडा 1725 मध्ये स्कँडिनेवियात शोधण्यात आला होता, ज्याला नंतर गुलग्लबर नाव देण्यात आले होते. या शब्दाचा अर्थ सोनेरी वृद्ध व्यक्ती असा होतो. या ठिकाणी उत्खनन कार्याचे नेतृत्व करणाऱ्या पुरातत्व तज्ञ कॅथरीन स्टेन यांनी याला एक अत्यंत खास शोध ठरविले आहे. मूर्तीचा आकार नखांइतका असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
1993 मध्ये पहिल्यांदा मिळाली होती फॉइल
जवळपास 36 सोन्याच्या मूर्तींपैकी अनेकांना एका वास्तूत दडविण्यात आले होते. तर उर्वरित मूर्ती भिंतींमध्ये आढळून आल्या आहेत. पुरातत्व तज्ञांनी प्रामुख्याने 1993 मध्ये सोन्याच्या दोन मूर्तींसह ही वास्तू शोधली होती. मागील दशकात उत्खननातून सोन्याचे 28 तुकडे मिळाले होते. परंतु नॉर्वे आणि पूर्ण स्कँडिनेवियामध्ये समान फॉइल आढळून आल्या आहेत. तर पुरातत्व तज्ञांनी पहिल्यांदाच एक छोट्या संरचनेत याचा शोध लावला आहे.
नॉर्वेत मिळतात फॉइल
सोन्याचे हे छोटे तुकडे आढळून येत असतात. हे तुकडे उत्खननात सापडतात किंवा मेटल डिटेक्टरद्वारे त्यांचा शोध लावला जातो. याचमुळे नॉर्वेच्या विविध ठिकाणी आणखी असे अनेक तुकडे सापडू शकतात असे ओस्लोमधील सांस्कृतिक इतिहास संग्रहालयाचे पुरातत्व तज्ञ इंगुन मॅरिट रोस्टँड यांनी सांगितले. अन्य ठिकाणी उत्खननादरम्यान पुरातत्वतज्ञांनी अशाचप्रकारे 30 वेगवेगळ्या फॉइल शोधल्या आहेत. अशाप्रकारचे फॉइल प्रामुख्याने प्राचीन धार्मिक स्थळांवर प्राप्त झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.