वैज्ञानिकांचा नवा शोध
पृथ्वीच्या गाभ्यानजीक एक विशाल समुद्रतळ असल्याचे एका नव्या संशोधनात आढळून आले आहे. सेस्मिक इमेजिंगद्वारे पृथ्वीचा गाभा समुद्रतळाने चहुबाजूने वेढला गेलेला असल्याचे समोर आले आहे. सायन्स ऍडव्हान्सेस नियतकालिकात प्रकाशित एका संशोधनानुसार हा समुद्रतळ पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 3200 किलोमीटर खाली आणि ग्रहाच्या मध्य पापुद्रय़ादरम्यान आहे, ज्याला मेंटल असे म्हटले जाते.
पृथ्वीच्या गर्भाचे अध्ययन करण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञ भूकंपाच्या तरंगांचे मापन करतात, जे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येत असतात. पृथ्वीच्या विविध संचरनांमधून आल्यावर हे तरंग कशाप्रकारे बदलतात हे पाहून संशोधकांनी एक नकाशा तयार केला आहे. या नकाशात पृथ्वीचा अंतरंग कसा आहे याचे अनुमानित चित्र मांडण्यात आले आहे. मागील संशोधनांमध्ये पृथ्वीच्या गाभ्यानजीक विशाल महासागराच्या क्रस्टच्या काही वेगवेगळय़ा पॉकेट्सची ओळख पटविण्यात आली होती. या पॉकेट्सना अल्ट्रा-लो-वेलोसिटी-झोन स्ट्रक्चर्स (युएलव्हीझेडएस) म्हटले जाते, कारण भूकंपीय तरंग यांच्या माध्यमातून अत्यंत मंदगतीने फैलावत असतात.

युएलव्हीझेडएसाठी कोर-मेंटल सीमेजीनक 20 टक्के हिस्स्याचे प्रथम परीक्षण करण्यात आले आहे. या सर्व हिस्स्याची अद्याप पूर्णपणे ओळख पटलेली नाही असे संशोधकाच्या मुख्य लेखिका आणि अलबामा विद्यापीठात भूगर्भशास्त्राच्या प्राध्यापिका समांथा हॅनसेन यांनी सांगितले आहे.
नव्या संशोधनात वैज्ञानिकांनी अंटार्क्टिका येथील 15 स्थानकांवर भूकंपीय उपकरणे जोडून तीन वर्षांपर्यंत डाटा प्राप्त केला आहे. दक्षिण गोलार्धाच्या डाटाचा वापर करून कोर-मेंटल सीमेचे हाय-रिझोल्युशन चित्र तयार करण्यात आले होते. कोरच्या तुलनेत मेंटल हे आवरण अत्यंत पातळ असून ते 724 किलोमीटर इतक्या जाडीचे आहे. जागांनुसार याची रुंदी वेगवेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्याने शोधण्यात आलेल्या युएलव्हीझेडएस हे ‘भूमिगत पर्वत’ असून ते पृथ्वीच्या वितळणाऱया गाभ्यातून उष्णता उत्सर्जित करत असल्याचे संशोधकांचे मानणे आहे. या आवरणाची उपस्थिती कोर-मेंटल सीमेत उष्णतेच्या प्रवाहाला साठवून ठेऊ शकते असे समांथा यांचे सांगणे आहे.









