भारतात अनेक स्थानी उत्खननातून पुरातन मूर्ती, वस्तू, वास्तू इत्यादी सापडतात असा अनुभव आहे. अशा ऐतिहासिक ठेव्यांमधून आपल्याला आपला धर्म, संस्कृती यांचे पुरातनत्व आणि महत्व समजते. एखाद्या राष्ट्राचा सांस्कृतिक पाया किती खोलवर आणि व्यापक आहे, हे त्या देशात किती पुरातन काळापासूनच्या वस्तू किंवा अवषेश सापडतात यावरुन ठरत असते.
म्हणूनच अशा मूर्ती, वस्तू किंवा वास्तू यांचे जतन केले जाते. त्यांचा अभ्यास केला जातो. प्राचीन काळात आपला समाज किती आणि असा प्रगत होता, तसेच त्याची जीवनशैली कशी होती, याचेही अनुमान या ऐतिहासिक ठेव्यांवरुन काढता येते. जगात प्रत्येक देशात अशा सापडलेल्या प्राचीन मूर्तींना अनन्यसाधारण महत्व दिले जाते आणि त्यांचे जतन केले जाते. आपला देशही अशा सांस्कृतिक ठेव्यांच्या संदर्भात पुष्कळ समृद्ध आहे. याचे प्रत्यंतर नुकतेच आले आहे.
बिहारच्या पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील धर्मपूर गावातील एका शेतात नांगरणी सुरु असताना भगवान विष्णूंची पुरातन मूर्ती सापडली आहे. ग्रामस्थांनी ती सुरक्षिपणे भूमीतून बाहेर काढून तिची स्थापना मंदिरासारख्या एका स्थानी केली आहे. ही मूर्ती किमान 2 हजार वर्षांची असावी असे तज्ञांचे प्राथमिक अनुमान आहे. ती मिळाल्याची सूचना त्वरित पोलिसांना देण्यात आली होती आणि पोलिसांनी आता पुढच्या कार्यवाहीला प्रारंभ केला आहे. या मूर्तीचे काबर्न डेटिंग केले जाणार असून त्यानंतर तिचे पुरातनत्व अधिक स्पष्ट होईल. या मूर्तीला सरकारी वस्तूसंग्रहालयात ठेवावे किंवा एक सुबक मंदिर निर्माण करुन तिची या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करावी, असा गावकऱ्यांचा आग्रह आहे.









