शेतकऱ्यांतून संताप, गैरप्रकारावर आळा घालण्याची गरज, प्रशासनाने पुढाकार घ्यावा
बेळगाव : बेळगाव परिसरातील बासमतीचा सुगंध देशात आणि विदेशातही दरवळतो. मात्र याच बसमतीला आता भेसळीचे ग्रहण लागले आहे. बासमती तांदळामध्ये इतर जातींचे तांदूळ भेसळ करून विक्री केले जात असल्याने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरल्याचे प्रकार सध्या दिसत आहेत. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरी करू लागला आहे. यासाठी आता प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बेळगावच्या सुगंधीत बासमतीमध्ये इतर जातीच्या तांदळाचे भेसळ केले जात आहे. हे नित्याचेच बनले असतानाही प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून व्यापारी लोक गडगंज बनू लागले आहेत. बेळगाव बासमतीला मोठी मागणी आहे. ही संधी व्यापारी लोक साधत आहेत. तेव्हा बेळगावच्या बासमतीचा दर्जा टिकविण्यासाठी तांदूळ भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. काही वर्षांपूर्वी बेळगावातून कोल्हापूरकडे दाखल झालेला बनावट बासमती बाजार समितीच्या पथकाने पकडला होता. त्यामध्ये मोठा तांदूळसाठा जप्त करण्यात आला होता. व्यापारी लोक बासमती तांदळामध्ये इतर जातीचे तांदूळ भेसळ करून विक्री करत असतात. नेहमीच अशाप्रकारे बासमती तांदळामध्ये इतर तांदूळ भेसळ करून विक्री केली जाते. यामुळे बासमतीचा दर्जा घसरू लागला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी
बेळगावच्या बासमतीला केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. बासमतीचा दर्जा चांगला राखण्यासाठी शेतकरी नेहमीच मोठे परिश्रम घेत असतात. पण शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले व्यापारी लोक बासमतीमध्ये इंद्रायणी, इंटाण आणि इतर कमी किमतीच्या तांदळाची त्यामध्ये भेसळ करतात. गिरणीमध्ये तांदळाला स्टीमर केले जाते. यामुळे बासमती आणि इतर जातीचे तांदूळ सहजासहजी ओळखणे अवघड जाते. वास्तविक स्टीमर केल्यामुळे बासमतीची मूळची चवही गायब होते. मात्र नागरिकांची फसवणूक करून स्वत:चा खिसा गरम करण्याकडेच अधिक लक्ष देण्यात येत असल्याचे प्रकार वाढले आहेत. पूर्वी बासमती फोडताना केवळ पॉलिश करून विक्री केली जात होती. पण तो अधिककाळ टिकण्यासाठी स्टीमरचा उपयोग करावा लागतो, असे सांगून त्यामध्ये इतर जातीचे तांदूळ मिसळले जात आहेत. काही वर्षांपूर्वी अशाचप्रकारे भेसळ केलेला तांदूळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून परत पाठविण्यात आला होता. त्यानंतर बासमतीचे दर गडगडले होते. वास्तविक बासमतीचे भात खरेदी करण्यासाठी व्यापारी लोक नेहमीच अग्रेसर असतात. शेतकऱ्यांकडून भात खरेदी केले जाते. त्यानंतर ते फोडून विक्री करतात. अधिक नफ्यासाठी काहीजण त्यामध्ये इतर तांदूळ भेसळ करू लागले आहेत. य् ाा सर्व प्रकारामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वास्तविक कमी दराने उत्तम दर्जाचा बासमती विक्री करणे तसे परवडणारेच नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण एका क्विंटल भाताला अधिकाधिक 50 ते 55 किलोच तांदूळ तयार होतो. यामुळे कोणीही तोट्यामध्ये विक्री करू शकत नाही. एकूणच बासमतीच्या या मागणीला व्यापारी लोक संधी म्हणून उपयोग करताना दिसू लागले आहेत. अशाप्रकारे जर बासमतीचा दर्जा घालविण्याचा प्रयत्न झाला तर तो शेतकऱ्यालाच मारक ठरणार आहे. तेव्हा प्रशासनाने अशाप्रकारे तांदूळ भेसळ करून विकणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
भेसळ करणाऱ्यांवर कारवाई गरजेची
सध्या अनेक व्यापारी पैशासाठी काहीही करत आहेत. केवळ बासमतीच नाही तर उच्च जातीच्या तांदळांमध्ये अनेक जातीचे तांदूळ भेसळ करून आपला व्यवसाय करत आहेत. मात्र याचा अधिक तर फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. जर अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्याच्या हाती केवळ माती राहणार यात शंका नाही. त्यामुळे अशांवर कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
-सुरेश पाटील, शेतकरी









