खेड :
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची 90 ते 95 टक्क्यांच्या आसपास कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. महामार्गाच्या खर्चात आणखी 200 कोटी रूपयांची वाढ झाली आहे. तसा प्रस्तावही मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते मंत्र्यांकडे पाठवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी पाहणी दौऱ्यादरम्यान दिली. महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी इकोफिक्स या मटेरियलचा वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांची जीवघेणी कसरत सुरू आहे. यंदाही चाकरमान्यांच्या मार्गात ही कसोटी कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांनी गुरुवारी पनवेल-पळस्पेपासून कामाच्या दौऱ्याला सुरूवात केली. त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम खात्यासह राष्ट्रीय प्राधिकरण खात्याचे अधिकारी होते. या पाहणी दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे. गणेशोत्सवापूर्वी मार्ग सुस्थितीत आणून कोणत्याही प्रकारचे खड्डे राहू नयेत, सर्व्हिस रोडची कामे चांगली व्हावीत, यासाठी कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत राहून कागदावर काम करण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच इकोफिक्स या उत्पादनाचा वापर केला जाणार आहे. या इकोफिक्सचे प्रत्यक्षात प्रात्यक्षिकही दाखवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. काही ठिकाणी ठेकेधारक कंपन्या नीट नव्हत्या. नैसर्गिक अडथळ्यांसह खोदाईमुळे अडचणी निर्माण होवून कामे लांबणीवर पडली. इंदापूर-माणगाव दरम्यानच्या कामांची निविदा उशिराने निघाल्यामुळे कामे प्रलंबित राहिली आहेत. बायपास, सर्व्हिस रोड, रेल्वे पुलांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यापूर्वी जी कामे राहून गेली आहेत, ती कामेही तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिल्याचेही मंत्री भोसले यांनी सांगितले.
शिवेंद्रराजे भोसले यांनी दुसऱ्यांदा रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत प्रवाशांना आशेचा किरण दाखवला असला तरी महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी 1 वर्ष तरी लागणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही गणेशभक्तांना कसोटीचा प्रवास करत गाव गाठावे लागणार आहे.
- गणेशोत्सवात कशेडी बोगदा सुस्थितीत असला पाहिजे!
गणेशोत्सवासाठी कोकणवासीय मोठ्या संख्येने गावी येत असतात. यासाठीच ते पाहणी दौरा करत आहेत. गणेशोत्सवात कशेडीचे दोन्ही बोगदे सुस्थितीत असले पाहिजेत, असे निर्देश देत बोगद्यातून प्रवास करताना चाकरमान्यांच्या मार्गात कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होणार नाहीत, याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या. गुऊवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बोगद्याची संपूर्ण पाहणी करत ते पुढील दिशेने रवाना झाले.








