ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात शरद पवारांच्या राजीनाम्यासंदर्भात निवड समितीची बैठक सुरू असताना एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
शरद पवार यांच्या राजीनामा आणि नवीन अध्यक्ष निवडीसाठी नेमलेल्या समितीने आज सकाळी प्रदेश कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव खा. प्रफुल्ल पटेल यांनी मांडला. हा ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला. दरम्यान, एकीकडे पक्ष नेत्यांची बैठक सुरू असतानाच पक्षाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते. या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. यावेळीच एका कार्यकर्त्याने स्वत:वर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आणि कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले.








