सात प्रवासी जखमी

प्रतिनिधी /मडगाव
विवाह समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी मडगावहून बेळगांवी जाणाऱया एका खासगी मिनी बसला जांबोटी येथे मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास अपघात झाला. यात सात प्रवासी जखमी झाले. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक आहे. या अपघातात मिनी बसचे मोठे नुकसान झाले. या मिनीबसमध्ये सुमारे 36 प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच मडगाव पालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी तातडीने जांबोटीकडे धाव घेऊन सर्वांची विचारपूस केली व काही जखमींना त्यांनी रूग्णवाहिकेतून गोव्यात आणले.
मडगावात राहणाऱया एका कुटुंबियातील मुलीचे लग्न बेळगांवी जिल्हय़ातील ंकितुर तालुक्यातील बैलूर येथे होते. या लग्न सोहळय़ाला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या जवळची मंडळी मिनीबसमधून जात असताना हा अपघात घडला. अपघातात सापडलेले बरेच प्रवासी हे खारेबांध परिसरातील आहेत.
बसचा स्टेरिंग रोड तुटल्याने अपघात
रविवारी रात्री 11च्या सुमारास ही मंडळी मिनीबसमधून विवाहस्थळी जाण्यासाठी निघाली होती. जांबोटी येथे पोहचताच मिनीबसचा स्टेरिंग रोड तुटला व मिनीबस उलटली अशी माहिती बसचा चालक श्रीकांत खोलकर यांनी दिली. शिवक्का व फकिरवा या दोन प्रवाशांना जास्त मार लागला. काही प्रवाशांचे हात प्रॅक्चर आणि डोक्याला दुखापत झाल्याची माहिती नगरसेवक महेश आमोणकर यांनी दिली आहे.
अपघातात जखमी झालेले प्रवासी हे खारेबांध परिसरातील असून नगरसेवक महेश आमोणकर यांचे मतदार आहेत. या अपघाताचे वृत्त पहाटे मिळताच श्री. आमोणकर यांनी मल्लेश होसमनी आणि त्यांच्या टीमसह मदतीसाठी कर्नाटकच्या दिशेने धाव घेतली. हा अपघात घाट परिसरात झाला असता तर मोठे संकट आले असते. काल सोमवार श्री दामबाबाचा दिवस. त्यामुळेच सर्व प्रवासी सुखरूप राहिल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली आहे.









