वाहतुकीला अडथळा : कायमस्वरुपी बंदोबस्त करा
बेळगाव : शहरात भटक्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. जनावरे भररस्त्यात ठाण मांडून बसत असल्याने अपघात वाढू लागले आहेत. मनपा मात्र याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. भटक्या जनावरांना पकडण्याच्या मोहिमेत सातत्य नसल्याने जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील यंदेखूट, बेळगाव-वेंगुर्ला मार्ग, चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, समादेवी गल्ली, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, शनिवार खूट, खडेबाजार, कडोलकर गल्ली, काकतीवेस आदी ठिकाणी या जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढू लागली आहे. आधीच वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच जनावरे भररस्त्यात बसू लागल्याने वाहतुकीचे तीनतेरा झाले आहेत. भटकी जनावरे पकडण्यासाठी मनपा मोहीम राबविते. मात्र प्रत्यक्षात ही जनावरे पुन्हा रस्त्यावरच भटकताना दिसून येतात. त्यामुळे जनावरे पकडण्याची मोहीम केवळ नाममात्र होत असल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांतून संताप
विशेषत: शहरातील कचराकुंड्या, चौक, सिग्नल आणि गर्दीच्या ठिकाणी ही जनावरे ठाण मांडून बसतात. स्मार्ट बसथांब्यांवरदेखील आसरा घेतात. दरम्यान त्याठिकाणी मलमूत्र आणि शेण पडत असल्याने दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. बसथांबे आणि रस्ते भटक्या जनावरांसाठी की नागरिकांसाठी? असा प्रश्नदेखील आता पडू लागला आहे. त्यामुळे मनपा भटक्या जनावरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करणार का? असा संतप्त सवालही नागरिकांतून उपस्थित होत आहे.









