दोन्ही डोळेही फोडले ः मुलीची प्रकृती अत्यंत नाजुक
वृत्तसंस्था / कराची
पाकिस्तानात अलपसंख्यांकावर (हिंदू, शीख, ख्रिश्चन) होणारे अत्याचार सुरूच आहेत. तेथे 8 वर्षीय हिंदू मुलीवर अत्यंत क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. याचबरोबर तिच्या दोन्ही डोळय़ांमध्ये चाकू खुपसण्यात आला आहे. ही मुलगी वाचण्याची शक्यता फारच कमी असल्याचे डॉक्टरांचे सांगणे आहे.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ही घटना घडली आहे. 8 वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबीयांना अत्यंत गंभीर स्थितीत आढळून आली होती. या मुलीवर सध्या उमरकोट येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी दिली आहे. याचबरोबर तिच्या दोन्ही डोळय़ांवर चाकूने वार करण्यात आले आहेत. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा देखील तिच्या दोन्ही डोळय़ांमधून रक्त वाहत होते.
सिंध प्रांतात राहणाऱया हिंदूंवर मोठय़ा प्रमाणावर अत्याचार होत आहेत. मागील आठवडय़ातच एका हिंदू सफाई कर्मचाऱयाला कथित ईशनिंदेप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी धर्मांधांनी त्याला प्रचंड मारहाण केली होती. तर काही महिन्यांपूर्वी 18 वर्षीय हिंदू मुलीवर भररस्त्यावर गोळय़ा झाडण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी सिंध प्रांतातच एका हिंदू मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला होता. ठार करण्यापूर्वी तिला जबर मारहाण करत गळा चिरण्यात आला होता.









