2025 आर्थिक वर्षातली कामगिरी : अमेरिकेत निर्यातही
वृत्तसंस्था/अहमदाबाद
आर्थिक वर्ष 2025 मध्ये 90000 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करण्यात दुध उत्पादन क्षेत्रातील दिग्गज कंपनी अमुल या कंपनीने यश मिळवले आहे. अमुलची दूधासह इतर उत्पादने देशभरामध्ये सर्वत्र विक्रीला उपलब्ध आहेत. आनंद, वलसाड, राजकोट, सुरत, गोध्रा, बडोदा या ठिकाणी कंपनीचे उत्पादन कारखाने आहेत. अलीकडेच कंपनीने सेंद्रिय डाळ, गव्हाचे पीठ, बासमती तांदूळ, मसाले यासारख्या क्षेत्रातही आपली उत्पादने विक्रीला उपलब्ध केली आहेत. एवढंच नाही तर अमुलने आपल्या दुधाची अमेरिकेत निर्यातही सुरू केली आहे. मिशिगन मिल्क प्रोड्युसर असोसिएशन यांच्याशी भागीदारी याकरीता कंपनीने केलेली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने 90 हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये हाच महसूल कंपनीने 80 हजार कोटी रुपये इतका कमावला होता. अमुलच्या सर्वच क्षेत्रातील उत्पादनामध्ये दुप्पट विक्री वाढ नोंदवली गेली आहे.
काय म्हणाले एमडी
अमुलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता म्हणाले, आर्थिक वर्ष 2026 पर्यंत जवळपास एक ट्रिलियनचा महसूल प्राप्त करण्याचे उद्दिष्ट कंपनीने समोर ठेवले आहे. विविध उत्पादनांच्या विक्रीमध्ये वाढीच्या कारणास्तव सदरचे उद्दिष्ट साध्य करणे कंपनीला शक्य होऊ शकते. त्यादृष्टीने कंपनी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. आर्थिक वर्ष 2025 मध्ये विविध उत्पादनांना चांगली मागणी राहिली आहे. विशेषत: उन्हाळ्यामध्ये कंपनीच्या आईक्रीम आणि मिल्कशेक उत्पादनांना ग्राहकांनी चांगलीच मागणी नोंदवली आहे.









