कोला-चॉकलेट बाजारात आणण्याचे संकेत : विना डेअरी उत्पादनांचा करणार समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी डेअरी कंपनी अमूल आपल्या पोर्टफोलिओमध्ये नॉन-डेअरी उत्पादनांचा लवकरच समावेश करणार आहे. अमूल नेस्ले, ब्रिटानिया, कोका कोला आणि आयटीसी सारख्या व्यवसायात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.
अमूल या देशातील सर्वात मोठ्या डेअरी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) जयेन मेहता यांनी सांगितले की, ब्रँड अमूल एकूण फूड आणि बेव्हरेज कंपनी बनण्याच्या तयारीत करीत आहे. जानेवारीमध्ये अमूलच्या एमडींनी कंपनीचा निरोप घेतला. यानंतर जयेन मेहता यांनी अमूलचे एमडी म्हणून पदभार स्वीकारला आहे. अमूल ब्रँडची मालकी गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनकडे आहे.
व्यवसाय वाढीवर देणार भर : एमडी, मेहता
जयेन मेहता म्हणाले, डेअरी हा आमचा मुख्य व्यवसाय राहील पण आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये इतर अनेक उत्पादनांचा समावेश करण्याचा विचार करत आहोत.
सर्वात मोठी डेअरी कंपनी सध्या अमूल मिल्क, अमूल बटर, अमूल चीज, अमूल आइक्रीम यासारखी उत्पादने बनवत आहे. आता अमूल नॉन-डेअरी उत्पादने, पेये, स्नॅक्स, डाळ, कुकीज, खाद्यतेल, ऑरगॅनिक फूड आणि फ्रोझन फूड यांसारख्या व्यवसायांमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे.
मेहता म्हणाले की, व्यवसाय वाढीच्या दृष्टीने अमूलसाठी नवीन व्यवसायात प्रवेश करणे अत्यंत आवश्यक आहे. आगामी काळात अमूल आईक्रीम पार्लर सुरू करण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अमूलचे नवे एमडी म्हणाले, बाजारातील वाढत्या स्पर्धेमुळे आम्हाला त्रास होत नाही. जेव्हा अधिक कंपन्या बाजारात प्रवेश करतात तेव्हा त्या उत्पादनाची बाजारपेठ वाढते आणि ती एक वेगळी श्रेणी बनते. आम्ही कोका कोलासारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यास तयार आहोत. सोबत यासह, आम्ही ब्रिटानिया, आयटीसीसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहोत.









