► वृत्तसंस्था/ प्रयागराज
बुधवार, 29 जानेवारी हा महाकुंभाचा 17 वा दिवस होता. याचदरम्यान मौनी अमावस्येला तिन्ही शंकराचार्यांनी सर्वप्रथम अमृतस्नान केले. त्यानंतर लहान गटांमध्ये ऋषी आणि संतांनी आपल्या देवतांच्या संगमावर प्रतीकात्मक स्नान केले. जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज रथावर स्वार झाले होते. निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज यांनीही संगमात स्नान केले. हेलिकॉप्टरमधून संत आणि भक्तांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पहाटेच आखाड्यांमधील साधू-मुनी अमृत स्नानासाठी निघाले होते. बुधवारी दिवसभरात विविध संगमांवर कोट्यावधी भाविकांनी संगमावर डुबकी मारत ‘योग’ साधला. बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत 7.64 कोटी भाविकांनी प्रयागराज येथील संगमामध्ये स्नान केल्याची नोंद झाली आहे.









