खासदाराच्या वडिलांकडून मोठी घोषणा
वृत्तसंस्था/ अमृतसर
अपक्ष खासदार अमृतपाल सिंहचे वडिल तरसेम सिंह यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. अमृतपाल लवकरच पंजाबमध्ये एक नवा पक्ष स्थापन करणार आहे. या नव्या पक्षाचे नाव लवकरच जाहीर केले जाणार आहे. हा पक्ष एसजीपीसी निवडणूक लढविणार असल्याचे तरसेम सिंह यांनी म्हटले आहे.
अमृतपालचे कुटुंब रविवारी सुवर्णमंदिरात पोहोचले होते. यादरम्यान तरसेम सिंह यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेबद्दल माहिती दिली आहे. पंजाबचे लोक सद्यकाळात अत्यंत वाईट स्थितीतून सामोरे जात असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
वारिस पंजाब दे या वादग्रस्त संघटनेचा प्रमुख अमृपाल सिंहने अलिकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील खडूरसाहिब मतदारसंघातून विजय मिळविला होता. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या अमृतपालने 5 जुलै रोजी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली होती. आता त्याच्या वडिलांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
अमृतपाल सिंह आसामच्या डिब्रूगढ तुरुंगात कैद आहे. अमृतपाल सिंह आणि 9 अन्य जण राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासून तुरुंगात आहेत. सरकारने एनएसए अंतर्गत गुन्हा नोंद करत अमृतपालची फसवणूक केल्याचा आरोप त्याचे वडिल तरसेम सिंह करत आहेत. तसेच त्यांनी स्वत:च्या पुत्राची मुक्तता करण्याची मागणी वारंवार केली आहे.