चौकशीनंतर घरी परत पाठविले
वृत्तसंस्था/ लुधियाना
आसामच्या डिब्रूगढ तुरुंगात कैद ‘वारिस पंजाब दे’ या वादग्रस्त संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहचे वडिल तरसेम सिंह यांना बुधवारी अमृतसर विमानतळावर सुरक्षा यंत्रणांनी रोखले आहे. तरसेम हे कतारची राजधानी दोहा येथे जाणार होते, परंतु सुरक्षा यंत्रणांनी त्यांना विदेशात जाण्यापासून रोखले आहे. विमानतळावर सुरक्षा अधिकाऱ्यांनी तरसेम याची चौकशी करत त्यांना घरी परत पाठविले आहे. यापूर्वी अमृतपालची पत्नी किरणदीप कौरला दिल्ली आणि अमृतसर विमानतळावर तीनवेळा विदेशात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. किरणदीप कौर ही ब्रिटिश नागरिक आहे.
अमृतसर येथील अजनाला पोलीस स्थानकावर झालेल्या हल्ल्यानंतर पंजाब पोलिसांनी अमृतपाल विरोधात मोठी मोहीम राबविली होती. अनेक दिवसापर्यंत शोध घेतल्यावर पोलिसांनी अमृतपालला अटक केली होती. अमृतपाल विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अमृतपालने लूट अन् अपहरणाचा आरोप तसेच स्वत:चा साथीदार मंदीप सिंह उर्फ तूफानला सोडेविण्यासाठी अजनाला पोलीस स्थानकावर समर्थकांसह हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलीस अधीक्षक जुगराज सिंह यांच्यासमवेत 6 पोलीस जखमी झाले होते.









