दोघेही 23 दिवसांपासून फरार ः आत्मसमर्पण करण्यापूर्वी तपास यंत्रणांच्या ताब्यात
वृत्तसंस्था/ अमृतसर
वारिस पंजाब देचा प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याचा सर्वात जवळचा सहकारी पापलप्रीत याला पोलिसांनी अटक केली आहे. अमृतसरमधील कथुनंगल येथून त्याला पकडण्यात आले. पापलप्रीतवर एनएसए लागू करण्यात आला असून त्याची रवानगी दिब्रुगड कारागृहात करण्यात येणार आहे. त्याच्यावर यापूर्वी 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस महासंचालक सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले. अमृतसरमधील आपल्या गावात आल्यानंतर त्याला आत्मसमर्पण करायचे होते, परंतु त्याआधीच पंजाब पोलीस आणि काउंटर इंटेलिजन्सने केलेल्या संयुक्त कारवाईत त्याला पकडण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अमृतपाल सिंगचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा पापलप्रीत 18 मार्चपासून अमृतपालसह फरार झाला होता. यानंतर गेल्या 23 दिवसात दोघेही एकमेकांसोबत असल्याची चर्चा होती. मात्र, आता पापलप्रीत हा एकटाच पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पापलप्रीतच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणा अमृतपालपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पापलप्रीतनेच अमृतपालला सरबत खालसा (शिखांचा धार्मिक मेळावा) बोलावण्याचे आवाहन केले होते. यासाठी त्यांनी अकाल तख्तच्या जथेदारांवर दबाव आणण्याची सूचनाही केली होती. पापलप्रीत हा अमृतसरच्या मजिठा हलके येथील मार्डी कलान गावचा रहिवासी आहे. त्याची आई सरकारी शिक्षिका असून वडील शेती करतात. 2017 मध्ये पापलप्रीतने वारीस पंजाब दे मध्ये सामील होण्यापूर्वी सिमरनजीत सिंग मान यांच्या खलिस्तान समर्थक पक्षात प्रवेश केला. याशिवाय तो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर खलिस्तान चळवळीचा सतत प्रचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी पापलप्रीत सिंगवर आयएसआयशी संबंध असल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. 12 नोव्हेंबर 2015 रोजी अमृतसरमधील चाटीविंड पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये पापलप्रीतवर भडकाऊ भाषण दिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.









