अटींसह मिळाला पॅरोल
वृत्तसंस्था/ अमृतसर
आसामच्या डिब्रूगढ तुरुंगात कैद खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहला संसद सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी चार दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. अमृतपालकडून करण्यात आलेल्या अर्जावर सर्व तपास प्रक्रिया पूर्ण केल्यावर उपायुक्त घनशाम थोरी यांनी पॅरोलची शिफारस केली आहे. 5 जुले ते 9 जुलैपर्यंत अमृतपालला पॅरोल मंजूर झाला आहे. याच्या अटी देखील जिल्हा प्रशासनाकडून डिब्रूगढ तुरुंग प्रशासनाला कळविण्यात आल्या आहेत.
5 जुलै रोजी अमृतपाल संसद सदस्यत्वाची शपथ घेणार आहे. डिब्रूगढ तुरुंगातून तो थेट संसदेत पोहोचणार आहे. तेथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात तो शपथ घेणार आहे. अमृतपाल सध्या डिब्रूगढ तुरुंगात स्वत:च्या सहकाऱ्यांसोबत कैद आहे. तुरुंगात असतानाच त्याने पंजाबच्या खडूर साहिब मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवत काँग्रेस उमेदवार कुलबीर सिंह जीरा यांना 1.97 लाख मतांनी पराभूत केले आहे.
अमृतपालचे प्रवक्ते राजदेव सिंह खालसा आणि वकील ईमान सिंह खारा यांच्याकडून त्याच्या शपथविधीची मागणी केली जात होती. यासंबंधी अमृतपालच्या वतीने तुरुंग महानिरीक्षकांना पत्रही लिहिण्यात आले होते. हे पत्र तुरुंग महानिरीक्षकांकडून अमृतसरच्या उपायुक्तांकडे पाठविण्यात आले हेते. त्यानंतर पंजाब सरकारने हे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे पाठविले होते. उपायुक्तांकडून तपास प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यावर पॅरोलची शिफारस करण्यात आली होती. यानंतर लोकसभा अध्यक्षांकडून यासंबंधी मंजुरी देण्यात आली.









