गेल्या 22 दिवसांपासून अमृतपालचा सुगावा सापडेना
वृत्तसंस्था/ चंदीगढ
वारिस पंजाब देचा सूत्रधार अमृतपाल सिंग गेल्या जवळपास 22 दिवसांपासून फरार आहे. या काळात 5 राज्यांतील 150 बसस्थानक आणि 300 छावण्यांवर 5 हजारांहून अधिक पोलिसांनी शोधमोहीम राबवली. पण अमृतपाल अजूनही तपास यंत्रणांच्या हाती सापडलेला नाही. याचदरम्यान आता पोलिसांनी अमृतपाल सिंगचा साथीदार जसविंदर सिंग पांगली नावाच्या अनिवासी भारतीयाला अटक केली आहे. जसविंदर सिंग हा फगवाडाजवळील जगतपूर जट्टा या गावचा रहिवासी आहे. गेली काही वर्षे तो ऑस्ट्रेलियात होता.
पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी नवी रणनीती आखली आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून, रजेवर गेलेल्या पोलिसांना परत बोलावण्यात आले आहे. अमृतपाल सिंगला 14 एप्रिलपूर्वी अटक करण्याचा प्रयत्न असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. नव्या रणनीतीचा एक भाग म्हणून अजनाळा, अटारी, खेमकरण, पट्टी, भिखीविंड, बाबा बकाला आदी ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.









