ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहला अखेर अटक करण्यात आली आहे. मागील 36 दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र, आज त्याने स्वतःच आत्मसमर्पण केलं. त्याला पंजाबच्या मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात त्याची रवानगी करण्याची तयारी सुरू आहे. एनएसए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
अमृतपाल सिंह हा अजनाळा घटनेनंतर फरार झाला होता. त्यानंतर पंजाब पोलिसांसह देशातील वेगवेगळय़ा राज्यातील पोलीस मागील 36 दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. देशातील महत्वाच्या सुरक्षा यंत्रणाही त्याच्या मागावर होत्या. मात्र, तो सर्वांनाच चकवा देत होता. आधी पटियाला, नंतर हरियाणातील शाहबाद आणि नंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी अशाप्रकारे अमृतपाल सतत आपली ठिकाणं बदलत होता. यूपी सीमेवरून तो नेपाळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या बहराईचमधील सीमेवर बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र तरीही तो सापडत नव्हता. मात्र आज अमृतपाल सिंहने स्वतःच आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला मोगा येथील गुरुद्वारातून अटक केली.
अमृतपाल सिंहच्या इतर साथीदारांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. अमृतपालची रवानगी दिब्रुगड तुरुंगात होऊ शकते. त्याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.









